मालवणात नगरपालिकेच्या कचरा गाडीवरील चालकास मारहाण

पालिका प्रशासन व पोलिसांचे असहकार्य ; कामगारांचा उद्यापासून कामबंद आंदोलनाचा इशारा

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर ; माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप महिला अध्यक्षा अन्वेशा आचरेकरांची उपस्थिती

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या कचरा गाडीवरील चालकास शहरातील वायरी येथे गणेश चव्हाण नामक व्यक्तीने केवळ गाडी वळवण्यासारख्या किरकोळ कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार घडल्याने कचरा संकलन यंत्रणेत कार्यरत असलेल्या ४० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आक्रमक पावित्रा घेत उद्यापासून पूर्णपणे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

या गंभीर घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे ‘या विषयात आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही थेट पोलीस ठाण्यात तक्रार द्या’ असे सांगून आपली जबाबदारी झटकली. यानंतर कर्मचारी पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी पालिकेचे अधिकृत पत्र आणण्याची अट घातल्याने प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या असंवेदनशील पत्रव्यवहारामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल झाले.

मुख्याधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात ४० कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा हा थंड प्रतिसाद अत्यंत अपमानकारक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मारहाण करणारे गणेश चव्हाण यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा नगरपरिषदेत येऊन संबंधित चालकाची जाहीर माफी मागावी आणि भविष्यात असा प्रकार करणार नाही याचे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी केली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून योग्य तो सन्मान आणि ठोस कारवाईची हमी न मिळाल्यास आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड न करता उद्यापासून मालवण शहराच्या स्वच्छतेचे संपूर्ण कामबंद आंदोलन छेडत आहोत. असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचरा समस्येची भीषण परिस्थिती आणि त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ प्रशासन आणि मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर राहील, असे त्यांनी सांगितले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी न्याय्य हक्कासाठी लढण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. हे निवेदन देण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि भाजपच्या महिला शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर या देखील उपस्थित होत्या.

error: Content is protected !!