
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार; वनराई बंधाऱ्यांच्या कामांना मिळणार गती
सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्यासाठी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी २५ हजार पिशव्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडे सुपूर्द केल्या. या मदतीमुळे जिल्ह्यातील वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीला हातभार लागणार आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, प्रकाश मोर्ये आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते. वनराई बंधारे हा कमी खर्चात आणि लोकसहभागातून राबवता येणारा प्रभावी जलसंधारणाचा उपाय आहे. नाले व ओढ्यांमध्ये वाळूने भरलेल्या पिशव्यांच्या साहाय्याने बंधारे उभारून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवले जाते. त्यामुळे भूजल पुनर्भरणास मदत होते, विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची पातळी टिकवण्यास हातभार लागतो, तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डोंगराळ भूप्रदेश आणि पावसाळ्यात वेगाने वाहून जाणारे पाणी लक्षात घेता वनराई बंधाऱ्यांना विशेष महत्त्व आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात ५ ते १० वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर पिशव्यांची आवश्यकता असते. जिल्हा बँकेने उपलब्ध करून दिलेल्या २५ हजार पिशव्यांमुळे या उपक्रमाला मदत होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक कटिबद्धयावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, “जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणारी संस्था आहे. पाणी हाच शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया आहे. वनराई बंधाऱ्यांसारख्या लोकचळवळीत बँकेला सहभागी होता येणे ही अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासकामांत बँक सदैव अग्रेसर राहील.”
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी जिल्हा बँकेचे आभार मानले. बँकेने उपलब्ध करून दिलेल्या पिशव्यांचे गरजेनुसार सर्व तालुक्यांमध्ये वितरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या प्रयत्नांना हातभार लागणार असून, लोकसहभागातून अधिकाधिक वनराई बंधारे उभारण्याच्या मोहिमेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







Subscribe to my channel






