मालवणात बाप्पाच्या सजावटीतून ‘हरित क्रांती’ ; नगरपरिषदेकडून पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा

विजेत्यांवर रोख पारितोषिकांची बरसात ; प्लास्टिक-थर्माकोलला ठाम नकार; पुनर्वापर, स्वच्छता, जलसंवर्धन अन् वृक्षसंवर्धनाला मिळणार विशेष गुण

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला आता पर्यावरण संवर्धनाची जोड मिळणार आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियान आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत मालवण नगरपरिषदेने पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा-२०२६ जाहीर केली असून, ‘हरित गणेशोत्सव, हरित मालवण’चा संदेश घराघरात पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

‘बाप्पाची भक्ती करा; पण निसर्गाचीही काळजी घ्या!’ या भूमिकेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्लास्टिक, थर्माकोल आणि पर्यावरणाला घातक साहित्याला फाटा देत नैसर्गिक, पुनर्वापरयोग्य आणि टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक सजावट करणाऱ्या घरांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

फक्त सजावट नाही; पर्यावरणाचा संदेशही महत्त्वाचा!

स्पर्धेत केवळ सजावटीचे सौंदर्य पाहिले जाणार नाही, तर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, प्लास्टिक-थर्माकोलमुक्त सजावट, कल्पकता, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, निर्माल्य संकलन, जलसंवर्धन, ऊर्जा बचत आणि वृक्षसंवर्धन यालाही गुण दिले जाणार आहेत.

बांबू, कागद, कापड, लाकूड, माती, नैसर्गिक फुले-पाने आणि टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराला विशेष प्राधान्य राहणार आहे. सौर ऊर्जा किंवा LED दिव्यांचा योग्य वापर करून ‘सुंदर सजावट आणि पर्यावरणपूरक विचार’ यांचा संगम साधणाऱ्या स्पर्धकांना चांगली संधी मिळणार आहे.

पहिल्या तीन विजेत्यांना रोख बक्षिसे!

घरगुती गणेश सजावट गटासाठी आयोजित या स्पर्धेत प्रथम क्रमांक – ₹७,५०० + प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – ₹५,००० + प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक – ₹२,५०० + प्रमाणपत्र. याशिवाय उत्कृष्ट पर्यावरणपूरक सजावट, उत्कृष्ट पुनर्वापर सजावट, उत्कृष्ट नैसर्गिक सजावट, उत्कृष्ट स्वच्छता व कचरा व्यवस्थापन आणि उत्कृष्ट पर्यावरण जनजागृती संदेश अशा विशेष पुरस्कारांचीही लयलूट होणार आहे.

१०० गुणांची काटेकोर परीक्षा!

पर्यावरणपूरक साहित्याला २०, कल्पकता व नाविन्याला १५, तर प्लास्टिक-थर्माकोलमुक्त सजावट, पुनर्वापर, ‘माझी वसुंधरा’ संदेश, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन यासह विविध निकषांवर एकूण १०० गुणांचे परीक्षण केले जाणार आहे.

१५ सप्टेंबर अंतिम मुदत!

मालवण नगरपरिषद हद्दीतील इच्छुक नागरिकांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज सादर करावेत. स्पर्धेसाठी शाडू मातीची किंवा नैसर्गिक साहित्याची गणेशमूर्ती, प्लास्टिक-थर्माकोलचा वापर टाळणे, ओला-सुका कचरा वर्गीकरण, निर्माल्य संकलन, पाणी व विजेची बचत आणि परिसर स्वच्छ ठेवणे या बाबी महत्त्वाच्या राहणार आहेत.

‘माझी वसुंधरा – माझी जबाबदारी!’‘

‘मातीचा गणपती, निसर्गाचा साथी’, ‘बाप्पाची भक्ती, पर्यावरणाची शक्ती!’ आणि ‘प्लास्टिकला नकार, पर्यावरणाचा स्वीकार!’ या संदेशातून मालवण नगरपरिषदेकडून नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘स्वच्छ मालवण – हरित मालवण’च्या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी केले आहे.

error: Content is protected !!