महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड 

कणकवली : महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून, तर श्री. धनंजय यादव यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनने २८ ऑगस्ट, २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, काजू क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेल्या श्री. मनीष दळवी यांची निवड करण्यात आली आहे. मूळचे वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथील असलेले श्री. दळवी यांचा अनुभव मंडळाला काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, सहकारी काजू प्रक्रिया प्रकल्प महासंघाचे प्रतिनिधी म्हणून धनंजय यादव यांचीही स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती काजू प्रक्रिया उद्योगातील विविध पैलूंना अधिक बळकट करेल.

राज्यातील काजू पिकाच्या विकासाला चालना देण्यासाठी १६ मे, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना झाली होती. सुरुवातीला या मंडळात एक अध्यक्ष, १२ संचालक आणि एक सदस्य सचिव होते. मात्र, २२ ऑगस्ट, २०२५ च्या नवीन शासन निर्णयानुसार मंडळाची रचना बदलण्यात आली आहे. त्यानुसार, स्वतंत्र संचालकांची संख्या ४ वरून ११ पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे मंडळाला विविध क्षेत्रांतील तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल. श्री. दळवी आणि श्री. यादव यांची नियुक्ती याच सुधारित रचनेचा भाग आहे, ज्यामुळे मंडळाला अधिक व्यापक आणि अनुभवी नेतृत्व मिळेल.

error: Content is protected !!