
वैभव नाईकांचा वनविभागाला इशारा; सावंतवाडी उपवनसंरक्षकांची भेट घेत हत्ती हटाव मोहिमेसाठी ठोस कार्यवाहीची मागणी
सावंतवाडी : दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा वाढता उपद्रव सुरू असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हत्ती लोकवस्तीत येत असल्याने मनुष्यहानीचा धोकाही कायम आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात हत्ती हटाव मोहीम राबवून ठोस उपाययोजना न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला.
हत्ती हटाव मोहिमेसंदर्भात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत वैभव नाईक यांनी सावंतवाडी वनविभाग कार्यालयात उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांची भेट घेतली. यावेळी हत्तींच्या वाढत्या उपद्रवाबाबत चर्चा करून वनविभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार वर्षांपासून दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून वारंवार हत्ती हटाव मोहीम राबविण्याची आश्वासने दिली जात आहेत. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता हत्ती हटाव मोहिमेला न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे सांगण्यात आले. हा स्थगिती आदेश उठविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा झालेला दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मोर्ले येथे ‘ओंकार’ नावाच्या हत्तीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संबंधित हत्तीला महिनाभरात पकडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दीड वर्ष उलटूनही त्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे नाईक यांनी सांगितले. हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून ते वारंवार लोकवस्तीत घुसत आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माणगाव परिसरात यापूर्वी हत्ती हटाव मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर दोडामार्ग-सावंतवाडी परिसरातही तातडीने मोहीम राबविण्याची गरज आहे, असे नाईक यांनी सांगितले.
येत्या महिनाभरात न्यायालयीन स्थगिती दूर करून हत्ती हटाव मोहीम सुरू करण्यात आली नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. तसेच दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथील नागरिकांनी हत्ती प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिला असून, या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा राहील, असेही वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संघटक बाळा गावडे, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख राजेश शेटकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, दोडामार्ग शहरप्रमुख चंदन गावकर, कुडाळ शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, दोडामार्ग युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, उपतालुकाप्रमुख संदेश राणे, मणेरी विभागप्रमुख प्रदीप सावंत, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.







Subscribe to my channel






