अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर ‘ऑन फिल्ड’!

दोडामार्ग दौऱ्यात बालकांच्या सुविधा, पोषण आहार आणि सेविकांच्या समस्यांचा आढावा

बालकांचे पोषण, सुविधा आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य; सेविका-मदतनीसांच्या कामाचे केले कौतुक

दोडामार्ग : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास समितीच्या सभापती श्रीमती अनुराधा नारकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देत महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

या दौऱ्या दरम्यान उसप, घोडगेवाडी आणि मोरगाव येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन बालकांना दिला जाणारा पोषण आहार, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता, बालकांची उपस्थिती तसेच उपलब्ध मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांचीही माहिती घेण्यात आली.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविकांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि कौशल्यविकासात्मक उपक्रमांची माहिती नारकर यांनी घेतली. बालकांसाठी कल्पकतेने आणि जबाबदारीने काम करणाऱ्या सेविका व मदतनीसांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

अशा उपक्रमांमुळे बालकांमध्ये शिकण्याची गोडी, आत्मविश्वास आणि विविध कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत होते, असे अनुराधा नारकर यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक असलेल्या सुविधा तसेच प्रलंबित कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बालकांना दर्जेदार पोषण आहार, चांगल्या सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रभावीपणे काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी पंचायत समिती दोडामार्गच्या सभापती श्रीमती पार्वती गवस, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती श्वेता धरणे, श्रीमती साक्षी तळवडेकर, श्री. रामा गवस, पंचायत समिती सदस्य श्रीमती स्नेहा गवस, श्री. संजय सातार्डेकर, संबंधित कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. यशवंत गवस तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी दोडामार्ग श्रीमती तारका साटम-पाटील उपस्थित होते.या दौऱ्यामुळे अंगणवाडी केंद्रांवरील प्रत्यक्ष परिस्थिती, समस्या आणि गरजा समोर आल्याने बालविकासाच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा व उपाययोजनांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

error: Content is protected !!