शायना एन.सी. यांच्या कृतीवर सिंधुदुर्ग युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांचा संतप्त इशारा
मालवण : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याच्या घटनेने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिंदे शिवसेनेच्या नेत्या शायना एन.सी. यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याच्या घटनेचा सिंधुदुर्ग युवती सेनेने तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे. बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अपमान करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांनी घेतला आहे.
बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका राजकीय पक्षाचे नेते नव्हते, तर ते मराठी माणसाच्या अस्मितेचा बुलंद आवाज आणि लाखो शिवसैनिकांच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांच्या विचारांवर असंख्य शिवसैनिकांची श्रद्धा आहे. अशा आदरणीय नेतृत्वाच्या छायाचित्राचा अवमान होणे ही अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह बाब आहे, अशा शब्दांत निनाक्षी शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला.
सत्तेची पदे येतील-जातील, राजकीय पक्ष बदलतील; मात्र बाळासाहेबांवरील निष्ठा आणि प्रेम कधीही बदलणार नाही! बाळासाहेबांचे विचार प्रत्येक शिवसैनिकाच्या रक्तात आणि मनामनांत जिवंत आहेत. त्यांच्या प्रतिमेचा अवमान म्हणजे शिवसैनिकांच्या भावना आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का देण्याचा प्रकार आहे. हा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.या संपूर्ण घटनेचा सिंधुदुर्ग युवती सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे निनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले.





Subscribe to my channel




