
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर; अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई, दि. २४ : मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मच्छीमार, मत्स्यपालक आणि संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ अधिक जलद व पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महा-डीबीटीच्या माध्यमातून तब्बल २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी केवळ कागदोपत्री न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी विभागाने नाविन्यपूर्ण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्यावा, असे राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष लक्ष केंद्रित करून लाभार्थ्यांची संख्या वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांचा लाभ नागरिकांना अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. भूजलाशयीन, निमखारे पाणी आणि सागरी मत्स्यव्यवसायासाठीच्या ६ राज्यस्तरीय, १९ जिल्हास्तरीय आणि ३ योजनांमध्ये सुधारणा, अशा एकूण २८ योजनांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ४ राज्यस्तरीय, १८ जिल्हास्तरीय आणि २ सुधारित योजनांसह एकूण २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविताना लाभार्थ्यांना कमीत कमी कागदपत्रांमध्ये अर्ज करता यावा, प्रक्रिया सोपी आणि समजण्यास सुलभ असावी, तसेच अर्ज भरताना कोणताही तांत्रिक अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.
‘ऑनलाइन’ प्रक्रिया म्हणजे लाभार्थ्यांसाठी अडथळा नव्हे, तर योजनांचा लाभ अधिक वेगाने मिळवून देण्याचे माध्यम ठरले पाहिजे, अशी भूमिका घेत पात्र लाभार्थी कोणत्याही कारणाने योजनांपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महा-डीबीटीच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक, गतिमान आणि लाभार्थीकेंद्री करून शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास विभागाने प्राधान्य द्यावे, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.






Subscribe to my channel






