सहा लाखांचे नुकसान; घटनास्थळी भेट देत केले सांत्वन, सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते मदत सुपूर्द
मालवण : बिळवस-भोगलेवाडी सडा येथील सुनिल भोगले यांच्या घराला लागलेल्या आगीत घरासह सहा वाहने जळून खाक झाली. या दुर्घटनेत भोगले कुटुंबाचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगी महान गावचे सुपुत्र, माजी युवासेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक संग्राम सुधीर साळसकर यांनी पुढाकार घेत भोगले कुटुंबाला आर्थिक मदत केली.
गुरुवारी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मिळताच संग्राम साळसकर यांनी त्याच दिवशी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सुनिल भोगले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. तसेच संकटाच्या काळात कुटुंबाला आधार मिळावा, या उद्देशाने तातडीची आर्थिक मदत दिली.
मालवण पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते ही मदत सुनिल भोगले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उद्योजक संग्राम साळसकर, शिवसेना विभागप्रमुख संतोष पालव, वेरळचे सरपंच धनंजय परब, महानचे सरपंच अक्षय तावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आगीच्या दुर्घटनेनंतर कठीण परिस्थितीत आर्थिक मदत केल्याबद्दल सुनिल भोगले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संग्राम साळसकर तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.संकटाच्या काळात गरजू कुटुंबाला मदतीचा हात देत संग्राम साळसकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली.