कुंभारमाठ येथील चिरेखाणीत ५ जण बुडाले ; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू

चौघाना वाचवण्यात यश ; मदतकार्यात अन्वेशा आचरेकर यांच्या स्कुबा डायव्हर्सची मदत

मालवण : कुंभारमाठ गोवेकरवाडी रस्त्यालगतच्या खाणीच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेले पाच जण बुडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. यात एका सोळा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला तर चार जणांना वाचविण्यात यश आले आहे. यातील एका महिलेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान बुडून मृत्यू पावलेल्या मुलीला अन्वेशा आचरेकर यांनी पाठविलेल्या अजित व रेहान स्कुबा डायव्हिंगच्या टीमने पाण्यातून बाहेर काढले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील भानुदास लोंढे यांच्याकडे दिवाळी सणात मुंबईवरून अंजली प्रकाश गुरव (वय-३०), गौरी प्रकाश गुरव (वय-१८), गौरव प्रकाश गुरव (वय-२१), करिश्मा सुनील पाटील (वय-१६), दुर्वेश रवींद्र पाटील (वय- ९) हे आले होते. हे सर्वजण आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान गोवेकरवाडी लगतच्या चिरेखाणीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. यात पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले. हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या राहुल भिसे या तरुणाला दिसताच त्याने तात्काळ पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या महिलेसह अन्य मुलांना वाचविले. मात्र यात करिश्मा पाटील ही पाण्यात बुडवून बेपत्ता झाली.

यात गंभीर बनलेल्या अंजली गुरव हिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करत तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य तीन मुले सुखरूप आहेत. या घटनेची माहिती मिळताच कुंभारमाठ पोलीस पाटील विठ्ठल बावकर, आनंदव्हाळ पोलीस पाटील दशरथ गोवेकर यांच्यासह सरपंच पूनम वाटेगावकर, मधुकर चव्हाण, विकास गोवेकर, भाई टेंबुलकर, सिद्धेश गावठे, बाबी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांनी अजित स्कुबा डायव्हिंग आणि रेहान स्कुबा डायव्हिंगच्या टीमला मदतीसाठी पाठविले. या टीमने पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील हिचा मृतदेह बाहेर काढला. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, जितेंद्र पेडणेकर, अनुप हिंदळेकर, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया पवार, श्री. धुरी यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील या मुलीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याबाबत पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.

error: Content is protected !!