खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी पायाभूत सुविधा उभारू – आ. निलेश राणे

कबड्डी फेडरेशन, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गरजा मांडाव्यात; लवकरच संयुक्त बैठक घेणार

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहणे हे आपले ध्येय आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा जिल्ह्यात निर्माण करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. कबड्डी फेडरेशन आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या गरजा व आवश्यक सुविधांची माहिती घेऊन त्यासाठी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा. याबाबत लवकरच बैठक घेऊन जिल्ह्यातील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले.

सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने, आमदार निलेश राणे यांच्या सहकार्याने आणि कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या आयोजनाखाली कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपदासाठी कुमारिका गटातील विद्यार्थिनींची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सहकार्यवाह अनंत वैद्य, मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक रंजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहरप्रमुख अभिषेक गावडे, कबड्डी फेडरेशनचे तुषार साळगावकर, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, रेवती राणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. निलेश राणे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड आणि जिद्द निर्माण होणे गरजेचे आहे. शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व दिले पाहिजे. सिंधुदुर्गातील तालुका आणि जिल्हास्तरीय खेळाडूंनी राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे, यासाठी त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.कबड्डीसारख्या पारंपरिक आणि लोकप्रिय खेळाला अधिक प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक सुविधा कोणत्या आहेत, याबाबत फेडरेशन आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचवावी. “तुम्ही आमच्याजवळ येऊन आवश्यक सुविधांबाबत सांगितले नाही, तर त्या गरजा आम्हाला कशा समजणार?” असा सवालही त्यांनी केला.

लवकरच कबड्डी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक तसेच शासन स्तरावरून मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आ. निलेश राणे यांनी दिली.

error: Content is protected !!