दहा महिने सत्तेत, तरी नळपाणी योजनेचा आढावा घेण्यासाठी विशेष सभा लावण्यास टाळाटाळ का ?

ठेकेदार आणि PMC च्या कामावर नगरसेवक मंदार ओरसकर यांच्याकडून प्रश्नचिन्ह

काम योग्य असेल तर माहिती देण्यास अडचण कसली? ठेकेदाराच्या मनमानीला सत्ताधाऱ्यांचा मूक पाठिंबा आहे का?

मालवण : शहरातील नळपाणी पुरवठा योजनेवरून सत्ताधारी महायुतीचे नगरसेवक व ठाकरे शिवसेना नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. शहराच्या विकासाशी आणि प्रत्येक नागरिकाच्या पाण्याच्या प्रश्नाशी निगडित असलेल्या महत्त्वपूर्ण नळपाणी योजनेवरून ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार सुहास ओरसकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत नळपाणी योजनेच्या कामाचा हिशोब मागितला आहे.

नळपाणी योजनेचे काम करणारा ठेकेदार आणि PMC यांच्याकडून कामाची योग्य अंमलबजावणी व देखरेख होत असेल, योजनेची सर्व माहिती उपलब्ध असेल, तर मग सभागृहात विशेष सभा घेऊन या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यास टाळाटाळ का केली जात आहे? माहिती देण्यास नेमकी अडचण काय? असा थेट सवाल ओरसकर यांनी उपस्थित केला आहे. निवडून आल्यापासून सभागृहात वारंवार मागणी करूनही आणि उपोषण करूनही या योजनेची आवश्यक माहिती मिळत नसेल, तर नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेली दहा महिने सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांना शहराच्या भवितव्याशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेचा आढावा घ्यावा असे वाटत नाही का? ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने काम झाले, दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले किंवा कामात त्रुटी आढळल्या, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सत्ताधारी त्याची जबाबदारी स्वीकारणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नळपाणी योजना ही कोणत्याही ठेकेदाराची खासगी मालमत्ता नाही, तर ती शहरातील नागरिकांच्या पैशातून आणि त्यांच्या हितासाठी राबवली जाणारी योजना आहे. त्यामुळे या कामाची संपूर्ण माहिती नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना मिळालीच पाहिजे. विशेष सभा घेऊन योजनेचा हिशेब मांडावा, हीच आमची मागणी आहे, अशी भूमिका मंदार ओरसकर यांनी मांडली आहे.

error: Content is protected !!