सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर!

‘EX-INS गुलदार’ प्रकल्पाची प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी निवड

‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’मध्ये दोन श्रेणींत नामांकन; २७ ऑक्टोबरला नवी दिल्लीत पुरस्कार सोहळा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) महत्त्वाकांक्षी ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ची प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी निवड झाली आहे. ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’ अंतर्गत या प्रकल्पाला ‘Best Innovation/Product’ आणि ‘Best Creative/Campaign’ या दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असल्याचे अधोरेखित झाले आहे.

या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत निमंत्रण पाठवले आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान जिल्हा प्रशासनाने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याचाही या निमंत्रणपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

समुद्राखालील पर्यटनाचा अनोखा अनुभव!

‘EX-INS गुलदार’ हा प्रकल्प कोकणातील पर्यटनाला नवी दिशा देणारा उपक्रम मानला जात आहे. पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळभित्ती आणि सबमरीन पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्राखालील वैशिष्ट्यपूर्ण अनुभव देण्याची संकल्पना या प्रकल्पात समाविष्ट आहे. सागरी वारसा जतन करणे, सागरी जैवविविधतेला पूरक वातावरण निर्माण करणे आणि पर्यटनाच्या नव्या संधी विकसित करणे, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत आहे. यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्यासोबतच स्थानिक पर्यटन व्यवसायालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

२७ ऑक्टोबरला नवी दिल्लीत पुरस्कार सोहळा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निमंत्रणपत्रानुसार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्ली येथील द ओबेरॉय, प्रेसिडेंट्स म्युझियम अँड लायब्ररी, तीन मूर्ती मार्ग येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.

सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी अभिमानाचा क्षण

‘EX-INS गुलदार’ प्रकल्पाला दोन श्रेणींमध्ये मिळालेले नामांकन सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाची बाब आहे. कोकणचे नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सागरी वारसा आणि पर्यटनातील नावीन्य यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वपूर्ण ठरू शकते.‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी झालेली निवड म्हणजे सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाच्या क्षमतेवर उमटलेली राष्ट्रीय स्तरावरील मोहोर असून, जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

error: Content is protected !!