मालवणच्या सागरी महामार्गावरील आठवडा बाजार हटणार ? 

मनसे तालुकाध्यक्षांच्या निवेदनानंतर तहसीलदारांचे पालिका मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांना पत्र

मालवण : शहरातील सागरी महामार्गावर भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे हा आठवडा बाजार सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत स्थलांतरित करण्याची मागणी मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी मालवण तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्याकडे केली होती. या पत्राची तहसील कार्यालयाने दखल घेतली असून गॅरी अन्ननसिएशन यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश नगरपालिका मुख्याधिकारी आणि मालवण पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

कोरोना कालावधीत मालवणच्या मुख्य बाजारपेठेत दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार सागरी महामार्ग रेवतळे येथे स्थलांतरित करण्यात आला होता. मात्र अद्याप पर्यंत हा आठवडा बाजार सागरी महामार्गावरच असून मुख्य रस्त्यावर असलेल्या या बाजारामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. सद्यपरिस्थितीत शहरात देऊळवाडा येथे भरणारा आठवडा बाजार आणि मुख्य बाजारपेठेत भरणारा आठवडा बाजार असे दोन बाजार भरत असून वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सागरी महामार्गावरील आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेत एकाच ठिकाणी हलवण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केली होती. या ठिकाणच्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिका देखील अडकून पडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. या निवेदनाची मालवण तहसील कार्यालयाने दखल घेतली आहे. याबाबत तहसीलदारांनी मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्र देत सदरील निवेदनाच्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, सन २०२० मध्ये कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून मालवण बाजारपेठेत भरणारा आठवडी बाजार हा तात्पुरत्या स्वरुपात सागरी महामार्ग देऊळवाडा येथे भरवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात आला. लॉकडाऊन बंदी कालावधी संपल्यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी म्हणजेय सोमवार पेठ येथे आठवडी बाजार सुरु करणे गरजेचे होते. परंतु अद्यापही आठवडा बाजार सागरी महामार्गाच्या ठिकाणी भर रस्त्यावर भरवला जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप वाहनचालक आणि नागरिकांना सहन करावा लागतो. तसेच छोटे-मोठे अपघातही होत असतात. तरी वाहतूक कोंडी लक्षात घेता सागरी मार्गावर भरला जाणारा आठवडी बाजार बंद करून पुर्ववत सोमवार पेठ आणि समुद्रकिनारी सुरु करण्यात यावा, असे निवेदन या कार्यालयाकडे सादर केलेले आहे. सदर निवेदनाची प्रत यासोबत आपलेकडे पाठविणेत येत आहे. तरी सदर निवेदनाचे अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही आपलेस्तवरुन करणेत यावी. त्याबाबत अर्जदार यांस कळविणेत यावे. तसेच केलेल्या कार्यवाहीची प्रत या कार्यालयास सादर करावी”.

मालवण बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांची आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेत नेण्याची मागणी आहे. त्या अनुषंगाने मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांच्या निवेदनानंतर मालवण तहसीलदार यांनी दिलेल्या या पत्रामुळे सागरी महामार्गावर भरणारा आठवडा बाजार मूळ बाजारपेठेत जाणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!