देवगड-वेंगुर्ला सागरी हद्दीत मासळी चोरीचा गंभीर आरोप; ट्रॉलर मच्छीमार आक्रमक

चार-पाच छोट्या नौकांकडून ट्रॉलरला घेराव घालून मासळी लुटल्याचा दावा; १३ संशयितांसह मालवणमधील पाच खरेदीदारांची नावे पोलिसांना दिली

देवगड : समुद्रात कष्टाने मासेमारी करायची आणि त्याच मासळीवर दुसऱ्यांनी डल्ला मारायचा! देवगड ते वेंगुर्ला सागरी हद्दीत ट्रॉलर नौकांमधील मासळी चोरी होत असल्याचा गंभीर आरोप ट्रॉलर मच्छीमारांनी केला आहे. चार ते पाच छोट्या नौका एकत्र येऊन ट्रॉलरला घेराव घालतात आणि त्यातील मासळी पळवून नेतात, असा आरोप मच्छीमारांनी केला आहे. या प्रकारामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत असून, आता या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ट्रॉलर मच्छीमार आपल्या नियोजित सागरी क्षेत्रात मासेमारी करत असताना चार ते पाच छोट्या नौका एकत्र येऊन ट्रॉलरला घेरतात आणि त्यातील मासळी लुटून नेतात, असे निवेदनात म्हटले आहे. हा प्रकार संघटितपणे होत असल्याचा आरोपही मच्छीमारांनी केला आहे. संबंधित छोट्या नौकांवर नाव किंवा नोंदणी क्रमांक नसल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वी तक्रारी दाखल केल्या जात नसल्याने अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मासळीची कथित चोरी आणि जाळ्यांचे नुकसान यामुळे ट्रॉलर व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

१३ संशयितांसह पाच खरेदीदारांची नावे पोलिसांकडे

या कथित मासळी चोरीप्रकरणी सहभागी असल्याचा आरोप असलेल्या १३ जणांची नावे, तसेच चोरीची मासळी खरेदी करणाऱ्या मालवण येथील पाच खरेदीदारांची नावे पोलिसांना सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता पोलिस या आरोपांची चौकशी करून संबंधितांची भूमिका तपासणार का, याकडे मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी

सहदेव बापर्डेकर, द्विजकांत कोयंडे, निवृत्ती तारी, गोपीनाथ तांडेल, इतियास होलसेकर, अशोक सारंग, अनिश कोयंडे, प्रणव पारकर आणि रिहान शेख यांच्या शिष्टमंडळाने देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सागरी हद्दीतील कथित मासळी चोरीला आळा घालावा, संबंधित नौकांची ओळख पटवावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

error: Content is protected !!