“हीच” आहे आ. वैभव नाईकांची संपत्ती, हिम्मत असेल तर जप्त करून दाखवा…!
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे तपास यंत्रणांना आव्हान
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांनी राजकीय सोर्स वापरून आपली संपत्ती वाढवल्याच्या अज्ञाताच्या तक्रारी नंतर लाचलूचपत खात्याकडून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या द्वारे त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असून आ. नाईक यांनी आमदारकीची साडेसात वर्षे आणि त्यापूर्वीच्या राजकीय कालावधीत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि तमाम शिवसेना नेत्यांच्या सहकार्याने शिवसैनिकांचे प्रेम आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळवले आहेत. हीच त्यांची खरी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती कधीही कोणीही हिरावून नेऊ शकत नाही, हिम्मत असेल तर तपासी यंत्रणांनी ही संपत्ती जप्त करून दाखवावी, असे आव्हान शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांची लाचलुचपत खात्याकडून चौकशी सुरु झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर श्री. खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाई बाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी उपातालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, सन्मेष परब, अनंत पाटकर, दत्ता पोईपकर, किशोर गावकर, गौरव वेर्लेकर, प्रसाद आडवलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना नेत्यांचे सहकार्य आणि प्रेमाच्या बळावर आमदार, जिल्हाप्रमुख अशी अनेक पदे मिळवली. लढवय्ये आमदार म्हणून त्यांची ओळख असून यामुळेच कुणाच्या तरी पोटात पोटशूळ उठला असून त्यांची खोटी तक्रार करण्यात आली आहे. वैभव नाईक यांनी कुठली संपत्ती कमवली असेल तर ती म्हणजे राज्यातील शिवसैनिकांचे प्रेम आहे. त्याचे मोजमाप करणे तपासी यंत्रणांना अशक्य आहे. वैभव नाईक हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या कुटुंबाचे पिढीजात व्यवसाय असून स्वतः वैभव नाईक यांनी कमावलेली संपत्ती म्हणजे शिवसैनिकांचे प्रेम आहे. आणि ही संपत्ती कोणी जप्त करू शकत नाही, असे ते म्हणाले.
… त्याच ताकदीने वैभव नाईक शिवसेना वाढवतील !
आ. वैभव नाईक हे लढवय्ये शिवसैनिक आहेत. त्यामुळे खोट्या कारवाया, चौकश्या करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्याच ताकदीने ते जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे काम करतील. वैभव नाईक हे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे कुटुंबप्रमुख असून खा. विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.