प्रशासनाच्या मदतीला भाजपा तत्पर; मालवणात १०० बंधाऱ्यांचा संकल्प

तहसीलदार गणेश लव्हे यांची भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट; शेती पंचनाम्यांसाठी सहकार्याची ग्वाही

मालवण : पावसाचा खंड, दुष्काळसदृश परिस्थिती आणि आगामी पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेता शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मालवण तालुका भारतीय जनता पार्टी सक्रिय झाली आहे. शेती पंचनाम्यांच्या प्रक्रियेत एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर मालवण तालुक्यात १०० बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात १० बंधाऱ्यांची उभारणी पूर्ण झाल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

भाजपा मालवण तालुका पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या शेती पंचनाम्यांची प्रक्रिया जलद आणि प्रभावीपणे पूर्ण व्हावी, तसेच कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यासाठी गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत प्रशासनाच्या सूचना पोहोचविण्यासह आवश्यक ती मदत करण्याची भूमिका भाजपा पदाधिकाऱ्यांनी मांडली.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांत शेतीचे नुकसान तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी शासनाच्या उपाययोजनांसोबतच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभारण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा मालवण तालुक्याने १०० बंधारे उभारण्याचा निर्धार केला आहे.

गावागावातील स्थानिक साधनसंपत्तीचा वापर करून छोटे माती बंधारे, पाणी अडविण्याची कामे आणि विविध जलसंधारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यामुळे पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातूनच तालुक्यातील शेती, पाणीटंचाई आणि जलसंधारणाच्या प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करता येतील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या उपक्रमांना सहकार्य करण्यासोबतच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी करण्याचा निर्धार भाजपा मालवण तालुक्याने केला आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, महेश मांजरेकर, जि.प. सदस्य क्षमा हडकर, भाजपा महिला मोर्चा मालवण तालुका ग्रामीण अध्यक्ष ॲड. समृद्धी आसोलकर, ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, अंशून गावडे, किशोर पेडणेकर, रोहेश गांवकर, सुमित सावंत, प्रवीण घाडीगावकर, प्रमिला पाताडे, सुशांत सुर्वे, सुशील गावडे, राजन आंबेरकर, संदीप हडकर यांच्यासह भाजपा मालवण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!