
वैभव नाईकांसह ग्रामस्थांची एमआयडीसी अधिकाऱ्यांना धारेवर धरत चौकशीची मागणी; भूखंडावर उत्खनन झाल्याचे पाहणीत स्पष्ट
कुडाळ : कुडाळ एमआयडीसीमधील भूखंड उद्योग व कारखान्यांसाठी देण्याऐवजी एका परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालय व रामदेव बाबा मंदिर उभारण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थ व ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कथित भूखंड वाटपाबाबत जाब विचारण्यात आला. संबंधित भूखंडावर उत्खनन करण्यात आल्याचेही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यामुळे भूखंड वाटपाच्या प्रक्रियेबरोबरच शासकीय जमिनीवरील उत्खननाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
यावेळी एमआयडीसीचे अधिकारी अविनाश रेवणकर यांनी संबंधित भूखंड अद्याप वाटप करण्यात आलेला नसल्याचे सांगितले. त्यावर, भूखंडाचे वाटप झालेले नसेल तर त्या ठिकाणी उत्खनन कसे झाले? असा सवाल वैभव नाईक व ग्रामस्थांनी उपस्थित केला. उत्खननाबाबत माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष भूखंडाची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान तेथे उत्खनन झाल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले.
शासकीय जमिनीवर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वैभव नाईक व ग्रामस्थांनी केली. त्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शासकीय जमिनीवरील अवैध उत्खननाबाबत मंडल अधिकारी प्रशांत मसुरकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
‘उद्योगांसाठी जमीन दिली, मंगल कार्यालयासाठी नाही’
एमआयडीसीच्या स्थापनेवेळी जमीन हस्तांतरित करताना स्थानिक जमीनमालकांना प्रति गुंठा ४२ रुपये मोबदला देण्यात आला होता. या परिसरात उद्योग व कारखाने येतील, या अपेक्षेने स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र, त्याच जमिनीचा वापर मंगल कार्यालय व मंदिर उभारण्यासाठी होणार असेल तर त्याला तीव्र विरोध राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी संबंधित भूखंडावर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळत आहे. हा कार्यक्रम झाल्यास तो उधळून लावू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी एमआयडीसीचे रत्नागिरी एरिया मॅनेजर संजय कसबे, मंडल अधिकारी प्रशांत मसुरकर, ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, विजय प्रभू, शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर यांच्यासह अतुल बंगे, योगेश धुरी, सुशील चिंदरकर, अमित राणे, गुरु गडकर, अजित मार्गी, प्रभाकर गावडे, दीपक गावडे, रामा कांबळी, स्वप्निल गावडे, महेश गावडे, केदार गावडे, भूषण गावडे, कृष्णा मराठे, राजन धोंड, विनय गावडे, बाबी आळवे, श्रीधर कोरजुवेलर, प्रथमेश गावडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.







Subscribe to my channel






