कमलाकर गावडे, शासकीय नोंदी तपासा, तुमच्या गटाचा अधिकृत गटनेता मीच !
गटनेते सुनील घाडीगांवकर यांची प्रतिक्रिया ; सभापती, उपसभापतींच्या कारभाराचा उद्या करणार पंचनामा
कुणाल मांजरेकर
मालवण : कमलाकर गावडे हे मालवण पंचायत समितीत ज्या गटाचे अधिकृत सदस्य आहेत, त्याचा गटनेता मीच आहे. २०१७ च्या निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे १० सदस्य गटाची अधिकृत नोंद आहे. त्यात कमलाकर गावडे आजही आहेत. याचा विसर गावडे यांना पडला असेल तर त्यांनी शासन दरबारी असलेल्या नोंदी तपासाव्यात, अन्यथा गटात नाही हे सिद्ध करावे, असे आव्हान मालवण पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी दिले आहे.
दरम्यान, सभापती, उपसभापती यांच्या कारभाराचा पंचनामा पत्रकार परीषद घेऊन शुक्रवारी करणार असल्याचा सूचक इशाराही घाडीगांवकर यांनी दिला आहे. पंचायत समिती बैठकीत अनुपस्थित असलेल्या सदस्यांसह शुक्रवारी पुढील रोखठोक भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मालवण पंचायत समितीत अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. गटनेते सुनील घाडीगांवकर आणि सभापती- उपसभापती यांच्यात उघडपणे आरोप- प्रत्यारोप सुरू झाले असून बुधवारी झालेल्या पं. स. बैठकीत आम्ही आठ सदस्य प्रशासनावरील नाराजीमुळे जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिलो, अशी भूमिका सुनील घाडीगांवकर यांनी मांडली होती. त्यावर अनुपस्थित सदस्यांपैकी कमलाकर गावडे यांनी आपण वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित असल्याचे सांगत सुनील घाडीगांवकर व अन्य कोणत्याही गटाशी आपला संबंध नसल्याचे जाहीर केले. गावडे यांच्या भूमिकेवर घाडीगांवकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. कमलाकर गावडे यांनी पाच वर्षात किती सक्षमपणे कारभार केला हे जनतेला माहित आहे. त्यामुळे त्यांनी बेताल वक्तव्य करू नये. शासकीय दरबारी ज्या गटाची अधिकृत नोंद आहे. त्या गटाचा सदस्य नाही हे कमलाकर गावडे यांचे विधान बालिश म्हणावे लागेल. कदाचित त्यांना प्रतिक्रिया देण्यास काही जणांनी भाग पाडल्याने गावडे चुकीच्या पद्धतीने विधाने करत असतील तर त्यांनी आपण कोणत्या गटाचे अधिकृत सदस्य आहोत याची खात्री करून घ्यावी, असे घाडीगांवकर यांनी म्हटले आहे.
… तर आगामी पं. स. सभेत व्हीप बजावण्याबाबत विचार करू
बहुमताचा गटनेता असताना कधीही पंचायत समितीत गटाचे राजकारण मी केले नाही. मात्र गेले काही महिने पंचायत समितीत सुरू असलेल्या मनमानी कारभाराला सत्ताधारी व विरोधी सदस्यही त्रासले आहेत. त्यामुळे सभेस अनुपस्थित राहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र त्यावर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण केले जात असेल तर गटनेता या नात्याने आक्रमक भूमिका मला घ्यावी लागेल. जनतेचे हित व मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही सदस्य शुक्रवारी भूमिका स्पष्ट करू. त्यासोबत आगामी पंचायत समिती बैठकीत व्हीप बजावण्याच्या अधिकाराचा अवलंब करायचा का ? याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे सुनील घाडीगांवकर यांनी म्हटले आहे.