दत्ता सामंत यांचं धक्कातंत्र ;  उबाठा गटाला मोठा हादरा, देवबाग सरपंच ग्रा. पं. सदस्यांसह शिवसेनेत दाखल …!

आ. निलेश राणे यांच्या विकासाच्या झंझावातामुळे माझ्या सारख्या राणे कुटुंबाच्या विरोधकालाही त्यांच्या कार्याची भुरळ : सरपंच उल्हास तांडेल यांची प्रतिक्रिया

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी धक्कातंत्र वापरत उबाठा गटाला मोठा हादरा दिला आहे. उबाठा गटातील देवबागचे विद्यमान सरपंच उल्हास तांडेल यांनी दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. उल्हास तांडेल हे उबाठा सोडणार, याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती. मात्र ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असताना श्री. तांडेल यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे. आपण कट्टर राणे विरोधक होतो. मात्र आमदार निलेश राणे यांनी निवडून आल्यापासून विकासाचा धडाका लावला आहे. त्यामुळे माझ्या सारख्या राणे विरोधकालाही त्यांच्या कामाची भुरळ पडली असून गावच्या विकासासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज आमच्या सोबत चार ग्रा. पं. सदस्य आहेत. पण भविष्यात या चारचे आठ ग्रा. पं. सदस्य होतील, याची जबाबदारी माझी आहे. मला आजपर्यंत गॉडफादर नव्हता. पण यानंतर दत्ता सामंत देतील ती जबाबदारी पार पाडीन, अशी ग्वाही उल्हास तांडेल यांनी दिली आहे.

उबाठा गटातील देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह ग्रा. पं. सदस्य रुपाली मोंडकर, अण्णा केळुस्कर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, विभागप्रमुख मंदार लुडबे, अरुण तोडणकर, अंजना सामंत, निलेश सामंत, घनशाम बिलये, रुपाली मोंडकर, अण्णा केळुस्कर, बाळा निकम, काका पेडणेकर, प्रतीक्षा चोपडेकर, दशरथ राऊळ, बबी कासवकर, नंदू कुपकर, शावलीन लुद्रिक, बाबा लुद्रिक, ज्ञानेश्वर धुरी, एन्जॉय तुळसकर, मिनिन लुद्रिक यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना उल्हास तांडेल म्हणाले, राणे साहेबांनी 1992 मध्ये देवबाग बंधाऱ्याचे काम केले होते, त्यांचे आमच्या गावावर विशेष प्रेम आहे. आज निलेश राणे यांनी आमदार म्हणून मागील नऊ महिन्यात मतदार संघात विकासाचा झंझावात निर्माण केला आहे. देवबाग गावात 158 कोटींचा बंधारा मंजूर केला आहे. त्यांच्या विकास कामाच्या धडाक्यामुळे माझ्या सारखा राणेकुटुंबाच्या विरोधात असलेल्या माणसाला देखील त्यांच्या पक्षात काम करण्याची इच्छा झाली. पुढील दोन वर्षात गावचा विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, हे ओळखून मी आजच्या प्रवेशाबाबत कोणाशी चर्चा केली नाही, ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे, ते नक्की येतील, ज्यांना नाही यायचं आहे, त्यांचा विचार मी करणार नाही. विकासाचे जे प्रश्न आहेत, ते 100 % मार्गी लावणार आहे, असे सांगून दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज 4 सदस्य असले तरी भविष्यात आठ सदस्य असणारच याची जबाबदारी माझी आहे.माझे कार्यकर्ते सक्षम आहेत. ते माझ्यापेक्षाही जास्त काम करतात. त्यात उच्च शिक्षित व मच्छिमार कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामुळेच मी आजपर्यँत निवडणुका जिंकत आलोय. मला कोणीही गॉडफादर नाही. मी संघर्षातून वाढलेला कार्यकर्ता आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राणे कुटुंब व दत्ता सामंत यांना अभिप्रेत काम करणार, असे उल्हास तांडेल यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!