गणरायाच्या आगमनाचा आनंद क्षणात विरला ; देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या यशचा नदीत बुडून अंत

गौरी-गणपतीसाठी मुंबईहून गावी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा देवकोंड येथे दुर्दैवी मृत्यू; हिवाळे गावावर शोककळा

मालवण : घरात गणरायाच्या आगमनाची लगबग… वाडीत भजनाचा भक्तिमय स्वर… सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावरही आनंदाची झळाळी… मात्र, नियतीच्या एका घावाने हा सारा आनंद क्षणात दुःखात बदलला. गौरी-गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या अवघ्या १८ वर्षीय यश अनंत धुरी याचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी मालवण तालुक्यातील हिवाळे धुरीवाडी येथील देवकोंड परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली.

यश हा सध्या नालासोपारा, मुंबई येथे राहत होता. गुरुवारी वडिलांसोबत तो गणेशोत्सवासाठी गावी आला होता. गावच्या मातीची ओढ आणि सणाचा उत्साह घेऊन आलेल्या यशने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत वाडीतील भजनातही सहभाग घेतला. पहाटे घरी परतल्यानंतर काही तासांतच त्याच्यावर काळाने घाला घातला. शुक्रवारी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास यश वाडीतील एका मित्रासोबत गडनदीपात्रातील पुलाच्या वरच्या बाजूस असलेल्या देवकोंड परिसरात पोहण्यासाठी गेला. नदीच्या पाण्यात काही वेळ पोहल्यानंतर अचानक पाण्याच्या चक्रीय प्रवाहाचा अंदाज न आल्याने यश पाण्यात बुडाला.

क्षणात घडलेल्या या घटनेने सोबत असलेला मित्रही हादरून गेला. त्याने तब्बल १५ ते २० मिनिटे नदीपात्रात यशचा शोध घेतला. मात्र, अथक प्रयत्न करूनही यशचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर घाबरलेल्या अवस्थेत त्याने घरी धाव घेत ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.

ग्रामस्थांची दोन तासांची धडपड; अखेर यश सापडला…पण निष्प्राण

घटनेची माहिती मिळताच हिवाळे गावातील ग्रामस्थांनी देवकोंड परिसराकडे धाव घेतली. हिवाळेचे पोलिसपाटील वीरेंद्र कदम यांनी तातडीने बेळणे पोलीस दूरक्षेत्राला माहिती दिली. त्यानंतर आचरा पोलीस ठाण्याचे API संजय कातिवले, ASI उत्तम वंजारे आणि पोलीस हवालदार सचिन करवंजे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, ग्रामस्थ आणि वाडीतील तरुणांनी स्वतः नदीपात्रात उतरून यशचा शोध सुरू केला. प्रत्येक क्षणागणिक कुटुंबीयांची आणि ग्रामस्थांची चिंता वाढत होती. जवळपास दोन तासांच्या अथक शोधानंतर नदीतील गाळात रुतलेल्या अवस्थेत यशचा मृतदेह आढळून आला.

यशला पाण्याबाहेर काढण्यात आले… मात्र, ज्या तरुणाला गणेशोत्सवासाठी हसत-खेळत गावी आणले होते, तो निष्प्राण अवस्थेत समोर पाहताना उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले.

देशसेवेचे स्वप्न उराशी; नियतीने मात्र हिरावून घेतले आयुष्य

यशने आंबोली सैनिक स्कूलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. देशसेवेची प्रबळ इच्छा मनात ठेवून त्याने नुकतीच नौदल आणि अग्निवीर भरतीची परीक्षा दिली होती. सैन्याच्या गणवेशात देशाची सेवा करण्याचे स्वप्न तो पाहत होता. कुटुंबीयांनाही त्याच्या भविष्यासाठी मोठ्या आशा होत्या. मात्र, ज्या वयात यशने आयुष्याची नवी स्वप्ने रंगवायला सुरुवात केली होती, त्याच वयात त्याचा जीवनप्रवास अचानक थांबला. देशसेवेचे स्वप्न घेऊन जगणाऱ्या या तरुणाचे स्वप्न नियतीने कायमचे अधुरे ठेवले.

सणाच्या आनंदाऐवजी घरात अश्रूंचा महापूर

गौरी-गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या यशच्या अचानक जाण्याने धुरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरात ज्या गणरायाचे स्वागत आनंदाने करण्याची तयारी सुरू होती, त्याच घरात आता यशच्या आठवणींनी अश्रूंचा महापूर आला आहे. या घटनेने संपूर्ण हिवाळे गाव सुन्न झाले असून गावावर शोककळा पसरली आहे.

यशच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, बहीण, काका-काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. येथील देवस्थानचे मानकरी देवेंद्र चंद्रकांत धुरी यांचा तो पुतण्या होय.या दुःखद प्रसंगी हिवाळेचे सरपंच रघुनाथ धुरी, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ आणि वाडीतील तरुणांनी शोध व मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली. याप्रकरणी पुढील तपास API संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली ASI उत्तम वंजारे आणि पोलीस हवालदार सचिन करवंजे करीत आहेत. यशच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!