

जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने आंदोलन स्थगित करण्याची कणकवली पोलिसांची सूचना
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू फळ बागायतदार यांना चालू वर्षी वातावरणातील फरकामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांकरीता आंबा काजु बागायतदार व व्यापारी महासंघाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष आनंद ढोके (रा. वाडातर ता. देवगड) यांच्या नेतृत्वात व स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उद्या २३ मार्च रोजी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रीनफिल्ड हॉटेल नांदगाव येथे रास्तारोको आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांनी माजी आमदार वैभव नाईक यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ नुसार नोटीस बजावली आहे. या नोटीसीत सदरचे आंदोलन स्थगित करण्याची सूचना करण्यात आली आहे.
या नोटीसीत म्हटले आहे की, “मी प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी कणकवली आपणास सुचित करतो की, मला प्राप्त असलेल्या भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे मधील अधिकार व शक्तीचा वापर करून आपणास या नोटीस द्वारे सुचित करत आहे की, आपण आपल्या मागण्या सनदशिर मार्गाने पुर्ण करून घेवून सदरचे रास्तारोको आंदोलन स्थगित करावे तसेच सिधुदुर्ग जिल्हयात संपूर्ण भुभागात म.पो.अधि. १९५१ चे कलम ३७(१) (अ) ते (फ), ३७ (३) प्रमाणे दिनांक २०/०३/२०२६ रोजी ०४.०० ते दिनांक ०३/०४/२०२६ रोजी २४.०० पर्यंत मनाई आदेश लागू आहे. सदर आंदोलन मुदतीत आपलेकडून अगर आपले सहकाऱ्यांकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या शासकिय अगर खाजगी मालमत्तेचे नुकसान झालेस किंवा आपणाकडून आक्षेपार्ह घोषणा, आक्षेपार्ह चिथावणीखोर वक्तव्य तसेच कोणतीही अप्रिय घटना घडून सार्वजनिक शांतता भंग झालेस किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील व प्रचलित कायदयानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. सदरची नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल याची नोंद घ्यावी.”



Subscribe to my channel




