महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परंपरा आता जगाच्या डिजिटल पटलावर!

घराघरातील बाप्पापासून भव्य सार्वजनिक मंडळांपर्यंत प्रत्येक गणेशोत्सवाची होणार अधिकृत डिजिटल नोंद

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि पिढ्यान्‌पिढ्या जपला गेलेला गणेशोत्सवाचा समृद्ध वारसा आता डिजिटल स्वरूपात जगासमोर येणार आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक परंपरेचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दस्तऐवजीकरण करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरांना कायमस्वरूपी डिजिटल स्वरूप देण्यासाठी ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये एकाच डिजिटल संग्रहात जतन केली जाणार आहेत. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ मुंबई-पुण्यासारख्या शहरांपुरता मर्यादित राहणार नाही. गावागावातील, वाड्या-वस्त्यांतील आणि घराघरातील बाप्पालाही या डिजिटल दस्तऐवजीकरणात स्थान मिळणार आहे.

घरच्या बाप्पापासून मंडळाच्या गणरायापर्यंत नोंद

घरगुती गणपतीची वर्षानुवर्षांची परंपरा, कुटुंबाची सजावट, आरास, स्थानिक प्रथा, लोककला आणि गणेशोत्सवाशी जोडलेल्या आठवणी यांची नोंद केली जाणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक योगदानालाही डिजिटल संग्रहात स्थान मिळणार आहे.

मूर्तिकार आणि कारागिरांची कलाही होणार अमर

गणेशमूर्ती घडविणाऱ्या पारंपरिक मूर्तिकारांपासून विविध हस्तकला कारागिरांपर्यंत अनेक कलाकारांच्या कलेचेही दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि पारंपरिक कौशल्याचा वारसाही डिजिटल माध्यमातून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार आहे.

फक्त फोटो आणि २ ते ४ ओळी… एवढाच सहभाग

या उपक्रमासाठी नागरिकांना कोणतेही स्वतंत्र ॲप डाऊनलोड करण्याची किंवा क्लिष्ट प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. घरातील किंवा मंडळातील गणपतीचा चांगल्या दर्जाचा फोटो आणि गणेशोत्सवाची माहिती सांगणाऱ्या दोन ते चार ओळी ‘Bappa.org’वर पाठविता येतील. प्राप्त माहितीची तज्ज्ञ समितीमार्फत पडताळणी करण्यात येणार असून, पडताळणीनंतर संबंधित योगदानकर्त्याच्या नावासह अधिकृत नोंद क्रमांक दिला जाणार आहे.

महाराष्ट्राचा गणेशोत्सव… आता जगासाठी डिजिटल वारसा

गणेशोत्सवाच्या असंख्य परंपरा, श्रद्धा, कला आणि आठवणी एका ठिकाणी जतन करण्याच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. नागरिकांनो, आपल्या घरचा बाप्पा, आपल्या गावची परंपरा आणि आपल्या मंडळाची ओळख जगासमोर आणा. आपल्या गणरायाची परंपरा नोंदवा… महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जतन करा… Bappa.org वर सहभागी व्हा आणि महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या जागतिक डिजिटल दस्तऐवजीकरणाचा भाग बना, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!