तारकर्लीत रापण संघाच्या कावनाला आग; मच्छीमार कुटुंबाचा संसारच जळाला

आग लावल्याचा संशय; संकटात सापडलेल्या कांदळगावकर कुटुंबाला आमदार निलेश राणेंचा धीर, मदतीची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

दिवसरात्र समुद्राशी झुंज देत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमाराच्या कष्टांवर एका आगीने क्षणात पाणी फेरले. तारकर्ली वरचीवाडी येथील कांदळगावकर रापण संघाच्या कावनाला शुक्रवारी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एक होडी पूर्णपणे जळून खाक झाली, तर दुसरी होडी अर्धवट जळाली. रापणीची जाळी, होड्या आणि मासेमारीचे अन्य साहित्य जळाल्याने सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेने कांदळगावकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून मच्छीमार समाजात हळहळ व्यक्त होत आहे.

कष्टाने उभा केलेला मासेमारीचा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कांदळगावकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, ही आग अज्ञात व्यक्तीने लावली असावी, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आगीमागचे नेमके कारण काय, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

मच्छीमारांसाठी होडी आणि रापणीची जाळी म्हणजे केवळ साहित्य नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार असतो. हंगामाच्या काळात हेच साधन जळून खाक झाल्याने पुढील दिवस कसे काढायचे, असा प्रश्न नुकसानग्रस्त कुटुंबासमोर उभा राहिला आहे.

स्थानिकांची धावपळ; अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात

आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत होड्या आणि मासेमारीच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले होते.

जळाल्या होड्या, राख झाली जाळी; आता मदतीची आस!

समुद्राच्या लाटांशी झुंज देत कुटुंबासाठी दोन पैसे कमावणाऱ्या मच्छीमाराला आता पुन्हा नव्याने उभे राहण्याचे आव्हान आहे. होड्या आणि जाळी जळाल्याने केवळ आर्थिक नुकसान झालेले नाही, तर आगामी मासेमारीवरही संकट निर्माण झाले आहे. आगीमागे घातपाताचा संशय व्यक्त होत असल्याने या घटनेची सखोल चौकशी करून सत्य समोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर नुकसानग्रस्त कांदळगावकर कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही होत आहे.

error: Content is protected !!