दूध उत्पादन १५ हजारांवरून थेट ५० हजार लिटरपर्यंत; जिल्ह्यात एक लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट – मनीष दळवी
बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला नवी दिशा देत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय योजना नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीतून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि सामूहिक सहभागातून उभी राहणारी चळवळ आहे. या चळवळीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, बांदा येथे दुधाळ जनावरे खरेदी योजनेअंतर्गत कर्जप्रस्तावांच्या मंजुरीपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमांतर्गत बांदा व मडुरा येथील एकूण २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक शेतकऱ्याला दोन नवीन दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी सादर केलेल्या कर्जप्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना बँकेच्या दारात जाण्याऐवजी बँकेनेच थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचून राबविलेला हा उपक्रम शेतकरीहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे.
यावेळी बोलताना मनीष दळवी यांनी जिल्ह्यातील दुग्धव्यवसायाच्या वाढत्या प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यातील दूध उत्पादन १५ हजार लिटरवरून ४० ते ५० हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे. ही समाधानकारक प्रगती असून आता जिल्ह्याने एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य, व्याजदरात सवलत आणि कर्जपुरवठ्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बँक प्रयत्नशील राहणार आहे. मात्र, दुग्धव्यवसायात केवळ जनावरांची संख्या वाढवून चालणार नाही, तर उत्पादन खर्च कमी करून व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत बनविण्यावर भर द्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जनावरांचे शास्त्रीय संगोपन, योग्य आहार व्यवस्थापन, पाणी व चाऱ्याचे नियोजन आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून ओला चारा, सुका चारा आणि पशुखाद्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था उभी करावी. महागडी यंत्रसामग्री प्रत्येक शेतकऱ्याने स्वतंत्रपणे खरेदी करण्याऐवजी दूध संस्था आणि शेतकरी गटांनी सामूहिकरीत्या खरेदी करून ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी, अशी उपयुक्त सूचनाही त्यांनी मांडली.
यावेळी भगीरथ संस्थेचे प्रसाद देवधर यांनी दुग्धव्यवसायातील प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शास्त्रीय पद्धतीने जनावरांचे संगोपन, योग्य आहार व्यवस्थापन आणि काळानुरूप बदल आत्मसात करण्याचे महत्त्व विशद केले. आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळावा आणि जिल्ह्याने एक लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठावा, अशी श्री देव बांदेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करत मनीष दळवी यांनी या दुग्धव्यवसाय चळवळीत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे, दुग्ध व्यावसायिक अनिरुद्ध करंदीकर, बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच बांदा आणि मडुरा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Subscribe to my channel




