नारायण राणेंच्या “निलरत्न” निवासस्थानाला कार्यकर्त्यांचे “सुरक्षा कवच”

जर आलात तर स्वतःच्या पायांनी जाणार नाही ; धोंडू चिंदरकर यांचा काँग्रेसला इशारा

कुणाल मांजरेकर

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा काँग्रेसने इशारा दिला होता. कणकवलीत हे आंदोलन होत असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राणेंच्या मालवण येथील निवासस्थानाला मंगळवारी संरक्षण दिले. काँग्रेस पक्षाकडे मुळात तालुका स्तरावर १०० कार्यकर्तेही नाहीत. अश्या स्थितीत स्टंटबाजी करत आमच्या नेतेमंडळींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची भाषा काँग्रेस करत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर येण्याचे धाडस त्यांच्यात नाही. तरीपण कोणी आलेच तर स्वतःच्या पायांनी माघारी जाणार नाहीत, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे, असा सज्जड इशारा धोंडू चिंदरकर यांनी यावेळी दिला.

कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याप्रकरणी काँग्रेसने आक्रमकता दाखवत महाराष्ट्रातील भाजप प्रमुख नेत्यांच्या निवासस्थाना बाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानाबाहेर मंगळवारी आंदोलनाचा इशारा सिंधुदुर्ग काँग्रेसने दिला होता. या पार्श्वभूमीवर मालवण चिवला बीच येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निलरत्न निवासस्थाना बाहेर भाजपच्या निवडक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत काँग्रेस पक्षाचा व त्यांच्या नेतेमंडळींचा निषेध नोंदवला. भाजप जेष्ठ पदाधिकारी भाऊ सामंत यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

भारतीय जनता पार्टीचा विजय असो…. पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बडो हम तुम्हारे साथ है… या घोषणाबाजीसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हाय हाय…नाना पटोलेचा जाहीर निषेध… अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, भाऊ सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती अजिंक्य पाताडे, महेश मांजरेकर, बबलू राऊत, विक्रांत नाईक, हरीश गावकर यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी धोंडू चिंदरकर म्हणाले, आम्ही भाजपचे काही कार्यकर्तेच फक्त येथे आलो. मात्र एवढेही कार्यकर्ते मालवण काँग्रेसकडे संपूर्ण तालुक्यात नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांची दखलही घेत नाही. मात्र एखादा कोणीतरी येईल आणि आंदोलनाची स्टंटबाजी करेल म्हणून आम्ही एकत्र आलो. राणेंच्या घरासमोर आंदोलन करण्याचे धाडस काँग्रेस करणार नाही. पण पडद्याच्या मागूनही कोणी राजकारण करू नये. हिम्मत असेल तर समोर यावे आम्ही दोन हात करण्यात तयार असल्याचे तालुकाध्यक्ष चिंदरकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!