केंद्राच्या ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेचा रत्नागिरीत खा. नारायण राणे यांच्याहस्ते शुभारंभ

जिल्ह्यात ४ लाख कलमांचे होणार मोफत वाटप ; २००० हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार ; १०० कोटींची होणार उलाढाल

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कृषी विभागातर्फे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना’ (PM-RKVY) अंतर्गत ‘मागेल त्याला काजू कलमे’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा रत्नागिरीत शुभारंभ झाला. यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र येथे खा. राणे यांच्याहस्ते उपस्थित शेतकऱ्यांना काजू कलमांचे अधिकृत वितरण करण्यात आले. शासन नेहमीच लोककल्याणकारी योजना राबवून जनतेसाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत असते. याचा फायदा आपले उत्पन्न वाढण्यासाठी करा, मात्र यासाठी कष्ट करण्याची आवश्यकता आहे, त्याची तयारी ठेवा अशा शब्दात खा. राणे यांनी मार्गदर्शन केले.  

कोकणातील काजू उत्पादनाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ​या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास चार लाख पूर्णपणे मोफत वाटप केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तब्बल २००० हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार असून, भविष्यात काजूच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होण्यास मदत होणार आहे. यावेळी खा. राणे यांनी संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील विविध झाडांची आणि प्रयोगांची अत्यंत बारकाईने पाहणी केली. तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शास्त्रज्ञांकडून संशोधनाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले . 

या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्यासह संशोधन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी किरण मालशे, संतोष वानखेडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रश्नात यादव, शास्त्रज्ञ आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!