कट्टा खालची गुरामवाडी येथे अज्ञात चोरट्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

पोलिसांकडून तपास सुरू ; मारेकऱ्याला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

मालवण : तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोहिणी रमेश गुराम (वय- ६५) या वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्ला करून संशयित चोरटे पळून गेले.

कट्टा खालची गुरामवाडी येथे आज सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या इराद्याने रोहिणी रमेश गुराम यांच्या घरात प्रवेश केला. या दरम्यान झालेल्या झटापटीत चोराने वृद्ध महिलेवर हल्ला केला. ज्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. हल्ला केल्यानंतर चोरटे तेथून पळून गेले. गंभीररीत्या जखमी असलेल्या श्रीमती गुराम यांना स्थानिक ग्रामस्थांनी पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान हल्ला करणारे चोरटे तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतली आहे.

error: Content is protected !!