भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याकडून निवडणूक शपथपत्रात अपूर्ण व चुकीची माहिती ?

ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मोठा आरोप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर कारवाईसाठी लेखी पत्र

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याने निवडणूक शपथपत्रात स्वतःच्या व पत्नीच्या नावावरील स्थावर मालमत्तेबाबत अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याचा मोठा आरोप ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याने करत या प्रकरणी सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र सादर केले आहे.

वैभववाडी तालुक्यातील कोळपे गटात हा प्रकार घडला असून येथील भाजपचे जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी निवडणूक शपथपत्रात अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते स्वप्नील संतोष रावराणे (रा. सांगुळवाडी) यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केला आहे.

या तक्रारीत स्वप्निल रावराणे यांनी म्हटले आहे, सन २०२६ च्या जि. प. निवडणुकीत प्रमोद रावराणे यांनी सादर केलेल्या नामनिर्देशन व शपथपत्रांमध्ये स्वतःच्या व पत्नीच्या नावावरील सर्व स्थावर मालमत्तेचा संपूर्ण खुलासा केलेला नाही. काही गावातील गट क्रमांकातील मालमत्ताचा शपथपत्रात उल्लेख नसल्याचा तसेच शपथपत्रातील माहिती व प्रत्यक्ष अधिकृत नोंदणी यांच्यात विसंगती असल्याचा आरोप केला आहे. आपण ही तक्रार अधिकृत महसूल अभिलेख, माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे आणि निवडणूक अभिलेखाच्या आधारे केलेली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि मतदारांना खरी माहिती मिळावी या उद्देशाने ही तक्रार केली आहे. त्यामुळे प्रमोद रावराणे यांच्यावर भारतीय न्याय संहिता व भारतीय सुरक्षा संहिता तसेच निवडणूक कायद्यातील दंडात्मक तरतुदीनुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!