
मसुरे-मर्डे येथे परब कुटुंबीयांची घेतली भेट : या दुःखात आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास
मसुरे : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा ज्येष्ठ सहकारी सौ. सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने परब कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी मसुरे-मर्डे येथे परब कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
सौ. सरोज परब यांच्या निधनाची बातमी शनिवारी रात्री समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त झाली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील एक जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी परब कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरोजताईंचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील. या दुःखद प्रसंगी परब कुटुंबीयांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी असून, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सरोज परब यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळताना आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्या सौ. क्षमा हडकर, वेरली सरपंच धनंजय परब, घुमडे उपसरपंच राजू सावंत, मसुरेचे माजी सरपंच संदीप हडकर, माजी उपसरपंच राजेश गावकर, मालोंडचे माजी उपसरपंच जितेंद्र परब, राहुल परब, गणेश परब, उमेश माने, रोहेश गावकर, तात्या हिंदळेकर, पुरुषोत्तम शिंगरे, यासिन सय्यद आदी उपस्थित होते.






Subscribe to my channel






