
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात; भाजपा युवा नेते विशाल परब यांची विशेष उपस्थिती
आरोस : बालपणीच्या आठवणी… शाळेच्या वर्गखोल्या… मित्र-मैत्रिणींची धमाल… शिक्षकांचे संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे शिक्षण… या साऱ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देत आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित या स्नेहमेळाव्याला भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांची विशेष उपस्थिती लाभली. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांमुळे शाळेचा परिसर जुन्या आठवणींनी भारून गेला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिदास सावंत होते. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निलेश परब, माजी मुख्याध्यापक येजरे सर, नाईक सर, प्रशालेचे मुख्याध्यापक वरक सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वर्षानुवर्षे दूर गेलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र आले. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि भावूकपणा दिसून आला. शिक्षकांनी दिलेले संस्कार, शाळेतील अनुभव आणि मैत्रीची नाती यांची पुन्हा एकदा मनमुराद उजळणी करण्यात आली.
शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी एकवटले
हा स्नेहमेळावा केवळ आठवणींमध्ये रमण्यासाठी नव्हता, तर आपल्या शाळेच्या भविष्यातील वाटचालीत माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार करण्याचा मंच ठरला. शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विविध उपक्रमांना हातभार लावण्याबाबतही विचारमंथन झाले. शाळेने दिलेले शिक्षण आणि संस्कार ही आयुष्यभराची शिदोरी असून, आपल्या शाळेचे ऋण जपण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.






Subscribe to my channel






