पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती



कणकवली : कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार आहे. त्यासाठी आठ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
कणकवली शहरातील २८ गुंठे शासकीय जागेवर पहिल्या टप्प्यात तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारले जाणार आहे. मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे केंद्र ठरणार आहे. या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवजयंतीच्या मुहूर्तावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाजाचे नेते एस. टी. सावंत, लवू वारंग आणि सतीश सावंत यांनी भवनाच्या आराखड्याची माहिती दिली. या सांस्कृतिक भवनामध्ये ५०० आसन क्षमतेचे अद्ययावत नाट्यगृह उभारले जाणार आहे. तसेच १५० आसन क्षमतेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह असणार आहे. याशिवाय आर्ट गॅलरी, लहान सभागृह, निवास व्यवस्था, प्रशस्त पार्किंग आणि सुशोभित गार्डनची सुविधाही असणार आहे. या वास्तूचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे प्रवेशद्वारावर उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा.याठिकाणी होणार आहे.

Subscribe to my channel




