निस्सीम साई भक्ताची एक्झिट !

कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील कोळंब येथील प्रख्यात हॉटेल मालवणीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कै. विजय गोपीनाथ कोळंबकर उर्फ बापू यांचे नुकतेच २८ सप्टेंबरला वयाच्या ७७ व्या वर्षी दुर्धर आजाराने निधन झाले. निस्सीम साई भक्त अशी ओळख असलेल्या बापूंच्या निधनाने केवळ कोळंबकर कुटुंबियांला नव्हे तर त्यांच्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक साईभक्ताला धक्का बसला आहे. आयुष्यभर साईंची सेवा करणाऱ्या बापूंच्या तोंडी अखेरच्या क्षणी देखील साईंचाच धावा होता. आज ९ ऑक्टोबरला त्यांना आमच्यातून जाऊन १२ दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने “कोकण मिरर” परिवाराच्या वतीने बापूंच्या आठवणींना थोडक्यात दिलेला उजाळा ….

मालवण तालुक्यातील मसुरे टोकळवाडी येथे ११ ऑगस्ट १९४५ ला बापूंचा जन्म झाला. लहान पणा पासूनच बापूंचा स्वभाव कष्टाळू… त्यामुळे त्यांनी मेहनत आणी कष्टाच्या जोरावर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवला. मालवण शहरा नजीक कोळंब येथे कोळंबकर कुटुंबाची वडिलोपार्जित जागा आहे. १९७२ मध्ये सौ. सीमा यांच्याशी लग्न झाल्या नंतर ते कोळंब येथे येऊन स्थायिक झाले. यावेळी त्यांनी लाकूड धंद्यासह अनेक लहान मोठे व्यवसाय केले. या दरम्यान मालवण शहरात चांगल्या घरगुती हॉटेलची उणीव असल्याने काही वर्षांपूर्वी त्यानी हॉटेल मालवणीची स्थापना केली. याठिकाणी चहा, नाश्ता सह अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद मिळू लागल्याने या हॉटेलला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला.

2001 मध्ये कोळंबमध्ये हॉटेल मालवणीची अधिकृत मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या ठिकाणी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रचंड मेहनत आणि परिश्रम याच्या बळावर या हॉटेलचा विस्तार त्यांनी वाढवला. काही कालावधीत त्यांचा सुपुत्र गणेश याने वडिलांच्या व्यवसायात लक्ष देण्यास सुरुवात केली. 2013 मध्ये हॉटेल मालवणी मध्ये चायनीज सुरु करण्यात आले. याठिकाणी वेगवेगळ्या नावीन्यापूर्ण डिशेस् सुरु करण्यात आल्या. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर 2016 मध्ये याठिकाणी पंजाबी जेवण सुरु करण्यात आले. या हॉटेल चा कारभार गणेश सांभाळत असला तरी बापू स्वतः जातीनीशी या ठिकाणी लक्ष देऊन असत. अगदी हॉटेलच्या भट्टीकडे देखील त्यांचा वावर असायचा. आज हॉटेल मालवणीचा विस्तार वाढला आहे. तालुक्यात या हॉटेलची वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे. या यशात बापूंचा फार मोठा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही.

बापू हे निस्सीम साई भक्त होते. साईबाबांवर त्यांची अढळ श्रद्धा होती. दादर मधून दरवर्षी मार्च महिन्यात शिर्डीसाठी पदयात्रा निघते. गेली अनेक वर्षे ते या पदयात्रेत सहभागी होत. त्यामुळे मुंबई मध्ये देखील बापूंचा मोठा मित्र परिवार आहे.

बापू अलीकडे काही वर्षे आजारी होते. दोन ते तीन वर्षांपूर्वी कॅन्सर सारख्या दुर्घर आजाराने त्यांना ग्रासले. एवढा मोठा आजार होऊनही त्यांनी या आजारापुढे हार मानली नाही. पूर्वीच्याच जिद्दीने त्यांनी हॉटेल मध्ये काम सुरु ठेवले. तसंच आपली साईभक्ती निरंतर सुरु ठेवली. अगदी यावर्षी सातत्याने हॉस्पिटलच्या वाऱ्या लागल्या असतानाही मार्च महिन्यात त्यांनी कुटुंबियांकडे हट्ट धरून एकट्याने शिर्डी आणि मुंबईचा आठ दिवसांचा दौरा केला. एवढी ऊर्जा त्यांच्या नसानसात भरली होती. अलीकडे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. त्यातच 28 सप्टेंबरला त्यांचे निधन झाले. मात्र यावेळीही अखेरच्या क्षणी साई नामाचा अखंड गजर त्यांनी कायम ठेवला होता. त्यातच रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. एवढेच नव्हे तर त्यांना मानणाऱ्या मित्र परिवार आणि साई भक्तांवर देखील शोककळा पसरली आहे. मुंबई सारख्या ठिकाणी साईभक्त मंडळानी त्यांच्या निधना नंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर ठिक ठिकाणी लावले आहेत. यातून साई भक्त परिवारात त्यांचे असलेले महत्व अधोरेखित होते. आज त्यांचा बारावा दिवस. बापू आजारी असले तरी कुटुंबाला फार मोठा आधार होते. त्यांच्या निधनाने आज त्यांच्या कोळंबकर कुटुंबाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!