लोकसहभागातून उभारलेल्या बंधाऱ्याचा कणकवलीकरांचा आदर्श राज्यासाठी दिशादर्शक!

पाणी बचत आणि योग्य नियोजनासाठी कणकवलीकरांचा पुढाकार कौतुकास्पद – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशा प्रकारचे आदर्श बंधारे उभारणार; प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था एकत्रितपणे करणार जलसंधारणाचे काम

कणकवली : कणकवली शहरातील नागरिकांनी एकजुटीने लोकसहभागातून गडनदीवर उभारलेला कच्चा बंधारा हा जलसंधारणाच्या दृष्टीने आदर्श उपक्रम ठरला आहे. पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी कणकवलीकरांनी राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नागरिकांचा हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे यांनी केले.

कणकवली शहरातील गडनदीवरील कनकनगर येथील लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कच्च्या बंधाऱ्याची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, अशोक करंबेळकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, दीपक बेलवलकर, डॉ. सुहास पावसकर, विलास कोरगावकर, दयानंद उबाळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कणकवली तालुका व्यापारी संघ, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बंधाऱ्याची पाहणी करून या उपक्रमाची माहिती घेतली.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, कणकवलीच्या धर्तीवर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्याची बचत आणि योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर भागांतही राबवता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यात अशा प्रकारचे आणखी आदर्श बंधारे उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांची मदत घेतली जाणार आहे. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंधारणाचे पहिले पाऊल टाकल्यानंतर आता कच्च्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणीसाठा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यात भविष्यात दुष्काळी परिस्थिती कमीत कमी निर्माण व्हावी, हा या प्रयत्नांमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जलसंधारणाचे काम केवळ प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी जनता, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाच्या कामकाजात काही त्रुटी असू शकतात; मात्र अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची तयारी आहे. सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय साधून जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे पुढे नेली जातील, असा विश्वासही पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

कणकवलीतील लोकसहभागातून उभारलेला हा बंधारा केवळ पाणीसाठा वाढविणारा उपक्रम नसून, भविष्यातील जलसुरक्षेसाठी लोकसहभागातून काय साध्य होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

error: Content is protected !!