सचिन धुरींच्या अटकेची बातमी अफवा; बाळा पावसकरांचा हल्लाबोल

खोट्या बातम्यांद्वारे जनतेची दिशाभूल करू नका; जनतेचे प्रश्न सोडवण्याचा शिंदे गटाला सल्ला

कुडाळ पोलिसांकडून अटकेचा आणि गुन्हा दाखल झाल्याचा इन्कार असल्याचा पावसकरांचा दावा

कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची आणि त्यांना अटक झाल्याची बातमी निव्वळ अफवा असल्याचा दावा करत ठाकरे शिवसेनेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख व प्रवक्ते बाळा पावसकर यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पावसकर यांच्या म्हणण्यानुसार, सचिन धुरी यांच्या अटकेबाबत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याबाबत सोशल मीडियावर बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. मात्र, कुडाळ पोलीस ठाण्यातून वस्तुस्थितीची माहिती घेतली असता धुरी यांना अटक करण्यात आलेली नसून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले आहे. सचिन धुरी हे साळगाव परिसरात ठाकरे शिवसेनेचे काम प्रभावीपणे करत असून त्यांच्या माध्यमातून स्थानिक नेतृत्व पुढे येत आहे. त्यामुळेच त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुरी यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करत असल्याचा आरोप करत पावसकर म्हणाले की, विरोधकांकडून टीका झाली की पोलीस ठाण्यात तक्रारी करण्याची भूमिका घेतली जाते. सत्ताधारी पक्षाने टीका सहन करण्याची ताकद ठेवली पाहिजे. वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन विरोधी कार्यकर्त्यांविरोधात तक्रारी करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. “सत्तेत असलेल्या शिंदे गटाकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. मात्र, त्या पूर्ण होत नसतील तर विरोधक टीका करणारच. त्यामुळे तक्रारींच्या राजकारणात अडकण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्या सोडवा,” असा टोला बाळा पावसकर यांनी लगावला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे तक्रारी करणे सुरूच ठेवल्यास आपणही त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर तक्रारी करू, असा इशाराही पावसकर यांनी दिला.

error: Content is protected !!