छत्रपतींच्या मालवण मधील आठवणींना उजाळा देणारा लेझर लाईट अँड साउंड शो राजकोट किल्ल्यावर दाखवणार

मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेले प्रेम कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आ. जठार यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अद्वितीय आहे. येथे छत्रपतींच्या मालवण मुक्कामातील इतिहासाची माहिती देणारा लेजर लाईट व साउंड शो निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण आपल्या आमदारकीचा सुरुवातीचा १ कोटींचा निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करणार असून या लेझर लाईट व साउंड शो मुळे राजकोट येथील महाराजांच्या स्मारकाला नवी झळाळी मिळेल, असे आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मालवण नगरपालिकेचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी राजकोट किल्ल्यावरील शिव स्मारकाच्या ठिकाणी लेझर लाईट व साउंड शो निर्माण करण्याची संकल्पना मांडत याबाबत आमदार प्रमोद जठार यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी आम. जठार यांनी राजकोट किल्ला येथे भेट देऊन शिवरायांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन परिसराची पाहणी केली. यावेळी राजकोट वासियांकडून आम. जठार यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, विलास हडकर, नगरसेवक रविकिरण तोरसकर, मंदार केणी, नगरसेविका महानंदा खानोलकर, शिवसेनेचे नगरसेवक बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, पं. स. सदस्या योजना कांबळी, महेश मांजरेकर, पंकज सादये, अजिंक्य पाताडे, सन्मेष परब, सौ. सेजल परब, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, सौ. ज्योती तोरसकर, भाऊ सामंत, शिवराज मंचचे अध्यक्ष भूषण साटम, राजू परुळेकर, अमृता फाटक आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रमोद जठार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली म्हणून प्रमोद जठारांनी आपल्या आमदार फंडाचा निधी महाराजांच्या चरणाशी अर्पण करावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. हा निधी कशाप्रकारे वापरला जावा याबाबत इथल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर राजकोट येथे सायंकाळच्या वेळात लेजर लाईट व साउंड शो होण्यासाठी निधी देण्यात यावा असे ठरले. लेझर लाईट शो मुळे येथे पर्यटकांची संख्या वाढेल आणि यामुळे मालवण पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी राजबजून जाईल. याठिकाणी लेजर लाईट शोमध्ये महाराजांचा पराक्रमी असा इतिहास दाखविण्यात येणार असून यासाठी डॉ. ज्योती तोरसकर त्याविषयी स्क्रिप्ट तयार करण्याचे काम करत आहेत. हा शो दहा ते पंधरा मिनीटांचा करण्यात येणार असून दर एक तासाने हा शो लावण्यात येणार आहे. देश विदेशातील पर्यटक याठिकाणी यावेत आणि महाराजांचे दर्शन घ्यावे आणि त्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे हिच भावना माझी आहे. येत्या २२ तारीखला अधिवेशन असून त्यावेळी परवानगी घेणार आहे आणि १ कोटीचा पहिला निधी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या येथील लेझर लाईट शो साठी आपण देणार आहोत. तसेच राजकोट येथून दिसणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदीवरही येत्या काळात अशाप्रकारे लाईट शो होऊ शकतो, असेही आम. जठार म्हणाले. राजकोट येथे उभारण्यात आलेले महाराजांचे स्मारक हे सुंदर आहे. कोकणात रायगड पासून सिंधुदुर्ग पर्यंत एक पर्यटनाची एक साखळी निर्माण करण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. संगमेश्वर कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे ‘त्यागाचे सर्वोच्च प्रतिक’ या स्मारकाच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली आहे. तर राजापूरला ब्रिटिशांची जी वखार आहे, जो किल्ला आहे त्याला सुशोभीत करण्याचे काम पुर्ण झाले आहे. विजयदुर्गला याठिकाणी आरमाराचे म्युझियम व हेलियम वायूचा शोध लावला त्याच एक म्युझियम होणार आहे. अशाप्रकारे रायगड- संगमेश्वर- राजापूर विजयदुर्ग आणि मालवण अशाप्रकारे एका साखळीत पर्यटकांना इतिहास अनुभवता येणार आहे, असेही आम. जठार म्हणाले.







Subscribe to my channel





