

संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले
मालवण : मालवण तालुक्यातील किनारपट्टीच्या एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून दाखल गुन्ह्यातील संशयीत युवकाची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी 15,000/- रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयीतातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.
याकामी फिर्यादी यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीला कोणत्यातरी अज्ञात कारणाने संशयीताने दि. 2/11/2025 रोजी राहत्या घरातून पळवून नेल्याची तक्रार मालवण पोलिस ठाण्यात दिनांक 23/11/2025 रोजी दाखल केली. त्यानुसार मालवण पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रमाणे मालवण पोलिसांनी संशयितास अटक करुन ताब्यात घेतले व प्राथमिक तपासकाम करून संशयितास दि. 23/11/2025 रोजी मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात हजर करण्यात आले. संशयितास या गुन्हात कोणी मदत केली का इ. कारणासाठी 3 दिवसांच्या पोलिस कस्टडीची मागणी केली होती. संशयितांतर्फे गुन्ह्याचे स्वरुप जामीनपात्र असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर आवश्यक रिकव्हरी व प्राथमिक तपासकाम पूर्ण झाले असल्याच्या कारणास्तव पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून मे. न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर संशयीतातर्फे जामीनअर्ज दाखल करण्यात आला. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयिताची रक्कम रु. 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली.



Subscribe to my channel




