ध्वजारोहणाचा मान गावातील दिव्यांगांना ; आडवली- मालडी ग्रामपंचायतीने घालून दिला आदर्श
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम
मालवण | कुणाल मांजरेकर
ग्रामपंचायत आडवली मालडी यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रामपंचायत मार्फत घरोघरी ध्वज वितरण करण्यात आले.
ग्रामपंचायतीला विद्युत रोषणाई तसेच तिरंगा फुगेच्या द्वारे आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. तसेच मुख्य नाका आडवली तिठा येथे फुग्यांचे तिरंगा सजावट करण्यात आलेली आहे. १३ ऑगस्ट रोजी ध्वज फडकवण्याचा मान सरपंच यांनी महिला उपसरपंच सौ. सोनाली पराडकर यांना दिला. तर १४ ऑगस्ट रोजी ध्वज फडकवण्याचे अधिकार गावातील दिव्यांग व्यक्ती संजय मारुती घाडीगावकर व सनीत सुधाकर पराडकर यांना देऊन वेगळा आदर्श सरपंच आडवली मालडी यांनी सर्वांसमोर ठेवला. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. १४ ऑगस्ट रोजी गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली असून यामध्ये शाळा अंगणवाडी सर्व शासकीय कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत जवळ गावचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून त्यामध्ये सर्व शाळा, अंगणवाडी सहभागी होऊन भव्य चित्ररथ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर १६ ऑगस्ट रोजी कृषी आरोग्य यावर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली असून १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत मानवी साखळी द्वारे आडवली तिठा येथे करण्यात येणार आहेत. या उपक्रमांना उपसरपंच, सर्व सदस्य, गाव स्तरावरील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी वर्ग, सर्व आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला बचत गट, महिला मंडळ ,भजन मंडळे युवक मंडळे, गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी, रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत आहे.