मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

गाय-म्हैस पालन, शेळीपालन, कुक्कुटपालनासाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; योजनेत सहभागी होण्याचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवक आणि पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना – २०२६’ जाहीर केली आहे. पशुधनावर आधारित व्यवसायांना चालना देणाऱ्या या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत संकरित गाय-म्हैस खरेदी, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच दुग्ध व्यवसायाशी संबंधित विविध प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

२६ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

या योजनेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर २०२६ पासून ऑनलाइन पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासाठी फार्मर आयडी आणि महा आयडीचा वापर करावा लागणार आहे. मंजूर अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात दोन टप्प्यांत जमा केले जाणार आहे. शासनाच्या निकषांनुसार अर्जांची छाननी व लाभार्थ्यांची निवड केली जाईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पासाठी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधाही राहणार आहे.

या योजनेत दुग्ध व्यवसाय – गाय व म्हैस पालन, शेळी-मेंढी पालन – गट प्रकल्प, कुक्कुटपालन – अंडी व मांस उत्पादन, डेअरीशी संबंधित प्रकल्प – अंडी उबवणी व इन्क्युबेटर युनिट, आधुनिक तंत्रज्ञान – चारा विकास, स्मार्ट कॉलर व सेन्सर आधारित सुविधा. यासाठी अनुदान उपलब्ध होणार आहे.

यात अनुदानाचे स्वरूप सर्वसाधारण प्रवर्ग – ५० टक्क्यांपर्यंत, अनुसूचित जाती-जमाती – ७५ टक्क्यांपर्यंत असे आहे. पशुपालनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि पशुपालकांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि शासनाच्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

error: Content is protected !!