१० व ११ ऑक्टोबरला बंदर जेटी वाहनतळावर स्थानिक लोककलांचे सादरीकरण; प्रवेश विनामूल्य
मालवण : कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक कलावैभवाचा अनुभव देणारा ‘बीच लोककला महोत्सव’ मालवणमध्ये रंगणार आहे. शनिवार, दि. १० आणि रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मालवण बंदर जेटी वाहनतळ येथे हा महोत्सव होणार असून, स्थानिक लोककला पथकांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्यातून कोकणातील पारंपरिक लोककला आणि लोकपरंपरांचे दर्शन घडणार आहे. स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळण्याबरोबरच नागरिक आणि पर्यटकांनाही लोककलेचा आनंद घेता येणार आहे.
सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून, नागरिक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.