नव्या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि. प., पं. स. च्या एवढ्या जागा वाढणार !
राज्यात सर्वाधिक जागा अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी जागा सिंधुदुर्गात वाढणार
कुणाल मांजरेकर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकां प्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सदस्य संख्या वाढविण्याबाबतच्या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये नेमक्या किती जागा वाढणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार राज्यात सर्वाधिक जागा अहमदनगर जिल्ह्यात वाढणार असून सर्वात कमी जागा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत वाढणार आहेत.
या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. ही सदस्या संख्या वाढणार असल्याने अनेक ठिकाणी राजकीय गणितेही बदलणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ जागा होत्या, त्या आता ८५ होणार आहेत. येथे तब्बल १२ जागा वाढणार आहेत. तर राज्यात सर्वात लहान जिल्हा परिषद सिंधुदुर्ग असणार आहे. येथील विद्यमान सदस्य संख्या ५० असून आता येथे ५५ सदस्य असणार आहेत. याच्या दुप्पट म्हणजे ११० पंचायत समिती सदस्य असतील. त्यामुळे सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या ५ तर पंचायत समितीच्या १० जागा वाढणार आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ इतकी होती. त्यामध्ये वाढ होऊन ती आता कमीत कमी ५५ आणि जास्ततीत जास्त ८५ असणार आहेत. यामुळे पुन्हा नव्याने गटांची रचना आणि आरक्षण जाहीर होणार आहे. ही संख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९ (१) मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची सध्याची संख्या २००० वरुन २२४८ इतकी होणार आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील ४००० वरुन ४४९६ इतकी होणार आहे.