कट्टा काराणेवाडीतील निसर्ग निवास चोरट्यांचा लक्ष्यबिंदू; सीसीटीव्हीत संशयित कैद, परप्रांतीय कामगार चौकशीसाठी ताब्यात
मालवण : कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मालवण तालुक्यातील कट्टा गुरामनगरी येथील काराणेवाडी निसर्ग निवास या बंगलो प्रकल्पात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला! एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ बंद बंगल्यांची कुलपे फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यातील एका बंगल्यातून सुमारे ३० हजार रुपये रोख आणि एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे चोरीला गेल्याचा संशय आहे. एकाच रात्री आठ बंगल्यांना लक्ष्य केल्याने परिसरात खळबळ उडाली असून, बंद बंगल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काराणेवाडी निसर्ग निवासमधील ‘आई’ नावाच्या बंगल्यातून अंदाजे ३० हजार रुपयांची रोकड आणि एक ग्रॅम सोन्याचे नाणे लंपास झाल्याचा संशय आहे. हा बंगला मुंबईस्थित ऋषिकेश सुभाष गिरकर यांच्या मालकीचा आहे. याशिवाय अन्य सात बंगल्यांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र, या सात बंगल्यांतून मौल्यवान वस्तू किंवा रोकड चोरीला गेल्याचे आढळलेले नाही.
विशेष म्हणजे, चोरी झालेल्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्याने फोडला. मात्र, अन्य काही बंगल्यांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत संशयित व्यक्ती कैद झाली आहे. त्यामुळे या फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
फॉरेन्सिक टीम अन् श्वान पथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांचे फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यासह सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. एकाच परिसरातील आठ बंद बंगल्यांची कुलपे फोडण्यात आल्याने चोरट्यांनी या बंगलो प्रकल्पाची रेकी केली होती का, याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
बांधकामावरील कामगार पोलिसांच्या ताब्यात
या प्रकल्पात काही नवीन बंगल्यांची बांधकामे सुरू असून, तेथे परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. चोरीच्या घटनेदरम्यान एक कामगार संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख आणि घटनेतील संभाव्य सहभाग तपासला जात आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणाचाही गुन्ह्यातील सहभाग निश्चित झालेला नाही.
बंद बंगल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
काराणेवाडी निसर्ग निवासमधील बहुतांश बंगले मुंबईसह अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मालकांचे आहेत. त्यामुळे हे बंगले बहुतांश काळ बंद असतात. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आठ बंगल्यांना लक्ष्य केल्याचा संशय आहे. सणासुदीच्या काळात बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांना रोखण्यासाठी प्रभावी गस्त आणि सुरक्षाव्यवस्था आवश्यक असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.
अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस अधिक तपास करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि संशयिताची चौकशी यांच्या आधारे या चोरीचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.




Subscribe to my channel




