
महेश कांदळगावकर यांचा बाबी जोगींवर पलटवार ; मी तुमच्या पक्षात लायक नव्हतो, तर राजीनामा दिल्यावर आपण आपल्या पक्षाचे आमदार, खासदार यांना घेऊन घरी भेटायला येण्याचे प्रयोजन काय होते ?
माझ्या क्लिप नाक्या नाक्यावर लावा, येणारा खर्च मी स्वतः देतो ; कोळंब पुलाचा दुरुस्ती ठेकेदार, आडारी येथील ठेकेदाराकडे केलेल्या कारनाम्याची चर्चा लक्षात आहे का ?
जनतेने दोनवेळा नाकारलेल्या महेश जावकर यांनी आम्हाला सल्ले देऊ नये, स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी देवगड आणि कुंभारमाठला आपण कोणाला आणि कितीवेळा भेटायला गेला, हे आम्हाला न्यात
मालवण | कुणाल मांजरेकर
ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांच्यावर केलेल्या जहरी टिकेला श्री. कांदळगावकर यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर तुमच्या पक्षातील हरी खोबरेकर यांच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते बोलले असते तर समजू शकलो असतो. पण शिवसेना शहरप्रमुख या पदाचा वापर करून मटका, जुगार, काँट्रॅक्टर यांच्याकडून हप्ता घेणाऱ्याने आमच्याबद्दल बोलू नये. कोळंब पुलाच्या दुरुस्ती ठेकेदार, आडारी येथील ठेकेदार यांच्याकडे केलेल्या कारनाम्याची चर्चा लक्षात आहे का ? गरीब बिचाऱ्या पारंपरिक मच्छीमारांचे नेते म्हणून मिरवायचे आणि पर्सनेट बोटीवर कारवाई केल्यावर त्या बोटमालकांबरोबर सेटलमेंट करायची अश्या सेटलमेंट करणाऱ्या व्यक्तीने आमच्यावर टीका करणे हे हास्यास्पद आहे, असा टोला श्री. कांदळगावकर यांनी लगावला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे की, बाबी जोगी म्हणत असलेल्या क्लिपांचे सहा वर्षापूर्वी कार्यक्रम झाले आहेत. उपोषण झाली आहेत. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याने त्यातून काही निष्पन्न झाले नाही. राजकारणात असे आरोप प्रत्यारोप होतच असतात. त्या त्या वेळची ती परिस्थितीही असते. काही वेळा चोरी पकडण्यासाठी चोराचा वेष परिधान करायला लागतो. काही क्लुप्त्या करायला लागतात. काही वेळा यश येत काही वेळा यश येत नाही. जर खरच त्यात काय तथ्य असले असते तर तेव्हा ते जनतेसमोर आले असते. ही बाब जेव्हा झाली तेव्हा तर मी आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष होतो. आपले नगरसेवक , शिवसैनिक, आमदार आमच्या कार्यपद्धतीवर नाराज होते, असं आपलं म्हणणे असताना आमचा राजीनामा का मागितला गेला नाही ? आपणाकडे ती एक सुवर्णसंधी होती. आज सहा वर्षानी आपणाला ही उपरती का झाली ? आमच्यामुळे आपल्या पक्षाचे नगरसेवक कमी नाही तर चार नगरसेवक वाढले होते. आपण मुंबई मातोश्री येथील चार नगरसेवकांचा पक्ष प्रवेश जाणीवपूर्वक विसरला वाटता. आपण जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा आपले आमच्या बद्दलचे मत वेगळे आणि आपल्या आमदार, खासदार यांचे मत वेगळे असं कसं ? जेव्हा आम्ही २०२२ ला राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा आम्ही जर लायक नव्हतो तर मग आम्हाला पुनः सक्रिय करण्यासाठी आपण आमदार, खासदार, शिवसेना पदाधिकारी यांना घेऊन आमच्या घरी येण्याचे प्रयोजन काय होते ? त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी दिलेली प्रेस आपल्या लक्षात आहे काय ? “महेश आमच्या परिवारातला आहे. पाच वर्षात प्रामाणिकपणे मालवण शहराला एक आकार आणि रूप देण्याचा प्रयत्न केला आहे . आम्हाला त्याचा अभिमान आहे. तो राजकारणी नाही पण समाजकारणात एक नंबर आहे.” आम्ही जर एवढे भ्रष्टाचारी, आपल्या नगरसेवकांच्या नावडीचे होतो तर मग त्यावेळी खासदार बोललेले सत्य की आपण दुसऱ्यांनी पाठवलेली प्रेस देवून करत असलेले आरोप सत्य ? याबाबत आमच्यामध्ये संभ्रम आहे.
आम्ही आपल्या नेत्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप केला नव्हता. फक्त लोकप्रतिनिधी नसताना प्रशासक कालावधीत प्रशासक तथा मुख्य अधिकारी संतोष जिरगे हे मनमानी कारभार करतात हे आमचे म्हणणे दोन अडीज वर्ष आपल्या आमदार याना निदर्शनास आणून देत होतो, त्याकडे दुर्लक्षच केला गेला. जर आमदार यांनी प्रशासनावर अंकुश ठेऊन काम केले असते तर अनेक कामे पूर्णत्वास आली असती हे आमचे म्हणणे होते.
भुयारी गटार ठेकेदाराबरोबर आर्थिक हितसंबंध होते म्हणून आम्ही त्यांचे टेंडर रद्द केले नाही असा आपला बिनबुडाचा आरोप आहे. समजा आमचा हितसंबंध होता म्हणून आमच्या कालावधीत त्याचे टेंडर रद्द केले नाही. मग आमचा कालावधी संपल्या नंतर 2021 ते 2024 या आपल्या आमदारांच्या कालावधीत हे टेंडर रद्द का गेले नाही ? इकडे पण शंकेला वाव आहे. पण आम्ही असे बिनबुडाचे आरोप करणार नाही .
आम्ही 2016 मध्ये शिवसेना भाजपा युती मार्फत निवडणूक लढवली होती आणि आमचं चिन्ह धनुष्यबाण होते. आणि आजही तोच पक्ष आणि तेच चिन्ह आहे. फक्त वरील नेतृत्व बदल झाला आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही पक्षाशी प्रतारणा केली नाही. या उलट आपण या नगरपालिका निवडणूक दरम्यान कुठल्या कुठल्या पक्षाला भेटलाय, याचा पूर्ण लेखाजोखा आमच्याकडे आहे आणि आपल्या पक्षाला पण याची कल्पना आहे. त्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आपणाला आहे. आमची पात्रता होती म्हणूनच आम्ही नगराध्यक्ष आणि आता स्वीकृत नगरसेवक झालो. आपणास आपल्याच प्रभागात दोन वेळा दारुण पराभव करून तिकडच्या जनतेने आपली पात्रता दाखवून दिली आहे . त्यामूळे आपण पात्रतेवर न बोललेच बरे.
जनतेने दोनवेळा नाकारलेल्या महेश जावकर यांनी आम्हाला सल्ले देऊ नये
महेश जावकर यांनी आमचा नगराध्यक्ष कारभार जवळून बघितलेला नाही. पण महेश जावकर यांचा लोकप्रतिनिधी म्हणून 10 वर्षाचा कारभार आम्ही नगरपरिषद कर्मचारी असताना जवळून बघितला आहे. उगाच आमच्या तोंडाचे कुलूप उघडू नका. चांगलं काम केले असते तर आपणाला दोन दोन वेळा नवख्या नगरसेवकांकडून हार पत्करावी लागली नसती. आपल्या सल्ल्याप्रमाणे बिल सादर करण्यापूर्वीच ठेकेदार यांच्या बिलाच्या कोऱ्या चेक वर सही करणारे, टेंडर न काढता दीड दीड लाखाची बिले काढणारे, संतोष जिरगे सारखे मनमानी कारभार करणारे मुख्य अधिकारी यांच्या बरोबर जुळवून घ्यायला पाहिजे होते का ? त्यामुळे आमची काळजी सोडा आणि आपण दोन दगडावर पाय न ठेवता कुठल्या तरी एका पक्षाशी प्रामाणिक रहायचा प्रयत्न करा. कारण या नगरपालिका निवडणुकीत आपण भाजपा, शिवसेनेच्या कुठल्या पदाधिकारी याना भेटला त्याची जंत्री आमच्याकडे आहे. त्यानंतर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यासाठी देवगड आणि कुंभारमाठला आपण कोणाला आणि किती वेळा भेटायला गेला हे पण आम्हाला न्यात आहे. स्वीकृत नगरसेवक यांच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती आपण आमच्या घरी येऊन आमच्या कडूनच घेऊन गेलाय हे तरी आपल्या स्मरणात नक्कीच असेल.
आपण एका बाजूने आम्हाला सल्ले देता आणि आपणच आमच्या कालावधीत आमदार, खासदार, पालकमंत्री असताना काम झाली नाही याचीही कबुली देवून आपल्याच आमदार खासदार यांच्यावर अविश्वास दाखवता. कारण आम्ही त्यावेळी आपल्या पक्षाचे नगराध्यक्ष होतो आणि त्यावेळी वैभव नाईक साहेब आमदार आणि विनायक राऊत साहेब खासदार होते हे विसरू नका. आमच्या कालावधीतील प्रस्तावित जवळपास १०० कोटीच्या विकास कामाचा लेखाजोखा आम्ही वृत्तपत्रातून जाहीर प्रसिद्ध केला होता त्याचे जरा कर्तेपणाने अवलोकन करा. उगाच प्रसिद्धीत राहण्यासाठी आणि वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी वायफळ बडबड करू नका हा आमचा तुम्हाला सल्ला आहे, असे महेश कांदळगांवकर यांनी म्हटले आहे.



Subscribe to my channel




