
नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; पावसातील खंडामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही
वैभववाडी : पावसातील प्रदीर्घ खंडामुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर ही भविष्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावातील नवलादेवी वाडी येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत पावसातील खंडामुळे भातशेतीवर झालेल्या परिणामांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी लक्ष्मण विठोबा हिवाळकर यांच्या शेतातील भातपिकाची पाहणी केली. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भातपिकाला अपेक्षित फुटवे आलेले नाहीत. तसेच भाताचे दाणेही पूर्णपणे परिपक्व झाले नसल्याची माहिती शेतकरी लक्ष्मण हिवाळकर यांनी दिली. पावसातील खंडाचा परिणाम तालुक्यातील ऊस पिकावरही झाला असून शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रत्यक्ष बांधावरची वस्तुस्थिती शासनापर्यंत पोहोचविणार
यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकणातील भाताच्या विविध जातींसह उसाच्या शेतीसमोर निर्माण झालेली अशी परिस्थिती यापूर्वी कधी पाहायला मिळाली नव्हती. जुन्या जाणकार शेतकऱ्यांकडूनही या परिस्थितीची तीव्रता अधोरेखित केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘ट्रिगर-१’मध्ये समावेश झाल्याने प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधणे आणि बांधावर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्ष पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद आणि स्थानिक अनुभवातून मिळालेली माहिती शासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविली जाईल.केवळ उपलब्ध आकडेवारी किंवा गुगल मॅपच्या आधारे नव्हे, तर प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली असून, सिंधुदुर्गची वस्तुस्थिती शासनासमोर ठोसपणे मांडून बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘पाण्याचा प्रत्येक थेंब जपला पाहिजे’
शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री राणे यांनी उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. “सध्याची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची सवय आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. गावपातळीवर जलस्रोतांचे संवर्धन, पाणी अडविणे आणि त्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
‘शेतकऱ्यांनी चिंता करू नये; शासन पाठीशी’
पावसातील खंडामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. ‘ट्रिगर-१’ अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या सवलती आणि उपाययोजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, उपसभापती साची कोलते, माजी सभापती भालचंद्र साठे, नासीर काझी, जि. प. सदस्य श्रावणी रावराणे, जि. प. सदस्य रिद्धी सुतार, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे, पं. स. सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, मंगेश लोके, महेश संसारे, सरपंच लीना पांचाळ, श्रद्धा रावराणे, बंड्या मांजरेकर, साधना नकाशे, रितेश सुतार, बाबा कोकाटे, परशुराम इस्वलकर यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बासुर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी प्रमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, कृषी अधिकारी कांता जाधव, विस्तार अधिकारी प्रवीण कुडतरकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Subscribe to my channel






