पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खा. निलेश राणेंसह पाच जण निर्दोष
सिंधुदुर्गनगरी : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असताना पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पाच जणांची जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी हायकोर्टाकडून आमदार नितेश राणे यांना अटकेपासून दहा दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांच्या अटकेचा प्रयत्न केला जात असताना त्यांना अटकाव करताना पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी आज ओरोस जिल्हा न्यायालयात सुरु असताना जिल्हा न्यायाधीश ए. एम. फडतरे यांनी श्री. राणे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्यासह, भाजप युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष तुकाराम साईल, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश बिडये यांचा समावेश आहे.