सागरी महामार्गावरील खोदलेले धोकादायक चर बुजवले

भाजप नगरसेवक ललित चव्हाण व कार्यकर्त्यांचा पुढाकार ; अन्य चर तात्काळ बुजविण्याच्या प्रशासनाला सूचना

मालवण : शहरातील सागरी महामार्गावर महावितरणच्या अंडरग्राउंड केबलसाठी खोदण्यात आलेले चर प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप कार्यकर्त्यांनी हे चर बुजवून घेतले आहेत. या चरांमुळे आतापर्यंत दोन अपघात झाले असून उर्वरित चर तातडीने बुजवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

शहरातील सागरी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या वतीने भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्ता ठिकठिकाणी खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही हे चर तसेच उघड्यावर राहिल्याने रस्ता धोकादायक बनला होता. या चरांमुळे दोन दुचाकीस्वारांचे अपघातही झाले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.

या समस्येची दखल घेत भाजप नगरसेवक ललित चव्हाण आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली. रस्ता धोकादायक स्थितीत असल्याने त्यांनी तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून चर बुजवण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत धोकादायक चर बुजविला. यावेळी युवा मोर्चा बूथ अध्यक्ष निनाद बादेकर, संजय खोत, समीर मडये, अजय आळवे आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत मुख्य चर बुजवण्यात आले असले तरी मार्गावर इतर ठिकाणी असलेले उर्वरित चर देखील तातडीने बुजवावेत आणि रस्ता पूर्ववत सुरक्षित करावा, अशा सूचना कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या कामामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

error: Content is protected !!