
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोठा सामंजस्य करार; महाराष्ट्राच्या सागरी उद्योगाला मिळणार नवी झेप
मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी औद्योगिक क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात झालेल्या या करारामुळे दिघी येथे अत्याधुनिक जहाजबांधणी केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तब्बल २७ हजार कोटींची गुंतवणूक
दिघी येथील प्रकल्पासाठी माझगाव डॉककडून सुमारे २७ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पात प्रतिवर्ष किमान २ दशलक्ष सकल टनभार जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करण्यास सक्षम अशा सुविधा येथे विकसित केल्या जाणार असून, यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
१५ हजार थेट, ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार!
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा रोजगार निर्मितीच्या दृष्टीने होणार आहे. प्रकल्पामुळे १५ हजार थेट आणि तब्बल ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जहाजबांधणी, अभियांत्रिकी, लॉजिस्टिक्स, पुरवठा साखळी आणि संबंधित उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.
दिघीत उभी राहणार आधुनिक सागरी औद्योगिक परिसंस्था
दिघी येथे केवळ जहाजबांधणी सुविधा नव्हे, तर त्याला पूरक औद्योगिक आणि पुरवठा साखळी परिसंस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून दिघीला जागतिक स्तरावरील जहाजबांधणी केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे एनशिपएमएल या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेला जात असून, ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’ च्या उद्दिष्टांनाही तो पूरक ठरणार आहे.
या करारावर एमडीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन आणि एनशिपएमएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कॅप्टन जगमोहन यांनी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. जटिल जहाजबांधणी, अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन आणि देशांतर्गत पुरवठादार व्यवस्था उभारण्याचा एमडीएलचा अनुभव या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.






Subscribe to my channel






