जि. प., पं. स. सह मालवण पालिकेवर भगवा फडकावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वाढदिवसाची भेट देणार
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास : शिंदे गटाचा मालवण मध्ये कोणताही फरक नाही
मालवण | कुणाल मांजरेकर
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूकांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांचे खऱ्या अर्थाने बिगुल वाजले असून या तिन्ही निवडणुका एकतर्फी जिंकून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाची भेट देणार असल्याचा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे. राज्यात शिंदे गटामुळे थोड्याफार प्रमाणात पक्षामध्ये अस्वस्थता पसरली असली तरी मालवण तालुक्यात शिंदे गटामुळे कोणताही फरक पडणार नाही. येथील सर्व शिवसैनिक मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असेही ते म्हणाले.
मालवण शिवसेना शाखेत हरी खोबरेकर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, निवडणुका जाहीर होण्या अगोदरच शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते शहरासह संपूर्ण तालुक्यात जोमाने काम करत आहेत. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या तिन्ही ठिकाणी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी कोट्यावधींचा निधी आला आहे. या ठिकाणी झालेली विकासकामे हीच शिवसेनेच्या उद्याच्या विजयाची नांदी ठरतील. त्यामुळे शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात उद्धव साहेबांना वाढदिवसाची भेट म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसैनिक भगवा फडकवणार असून मालवण नगरपालिकेसह येथील पंचायत समितीतही शिवसेनेचे वर्चस्व असेल. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक या निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवून देतील. मालवण तालुक्यातील एकही कार्यकर्ता शिंदे गटात गेलेला नाही. त्यामुळे येथील शिवसैनिक मातोश्रीशी एकनिष्ठ असल्याचे ते म्हणाले.