धोकादायक विहिरीत पडलेल्या म्हशीला नागरिकांनी दिले जीवदान!

धुरीवाडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जागेतील दुर्घटना; विहिरीला कठडा उभारण्याची नागरिकांची मागणी

मालवण : शहरातील धुरीवाडा साई मंदिरनजीक नगरपालिकेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जागेतील कठडा नसलेल्या धोकादायक विहिरीत म्हैस पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

म्हैस विहिरीत पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. तब्बल तासभर अथक प्रयत्न करून नागरिकांनी म्हशीला सुखरूप बाहेर काढले आणि तिला जीवदान दिले.

या ठिकाणी असलेल्या पायवाटेने परिसरातील नागरिकांची नियमित ये-जा असते. जमीन सपाटीला असलेली आणि कोणताही कठडा नसलेली ही विहीर नागरिकांसाठीही धोकादायक ठरत आहे. भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपालिकेने तातडीने विहिरीभोवती संरक्षक कठडा उभारून धोका दूर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

error: Content is protected !!