ऑनलाइन गेमिंगला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्गात विशेष सायबर यंत्रणा

अतिरिक्त मनुष्यबळ व विशेष पथकासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग : ऑनलाइन मटका, ऑनलाइन गेमिंग आणि त्यातून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष सायबर यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ आणि विशेष पथक उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध महत्त्वाच्या विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री राणे यांनी जिल्ह्यातील ऑनलाइन गेमिंग आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या.

जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईमुळे मटका आणि जुगाराची अनेक केंद्रे बंद झाली आहेत. मात्र, पारंपरिक पद्धतींवर कारवाई झाल्यानंतर हेच प्रकार ऑनलाइन माध्यमातून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन मटका, गेमिंग आणि सायबर गुन्ह्यांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची सायबर यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.

ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या वापरामुळे विशेषतः तरुण-तरुणींना त्याचे व्यसन लागण्याचा, आर्थिक नुकसान होण्याचा तसेच त्यातून विविध सामाजिक आणि मानसिक समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. काही आठवड्यांपूर्वी वेतोरा येथे ऑनलाइन गेमिंगच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याचेही पालकमंत्री राणे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

गोवा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचे डिटेक्शन, तपास आणि प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक क्षमता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी अतिरिक्त मनुष्यबळ किंवा विशेष पथकाची गरज भासल्यास मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्गला विशेष बाब म्हणून आवश्यक ताकद उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

भातपिकाच्या नुकसानीचाही आढावा

या बैठकीत जिल्ह्यातील शेतीच्या परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. पावसाचा खंड आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे काही भागांत भातपीक करपण्याच्या घटना समोर आल्या आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ला आणि वैभववाडी तालुक्यांत शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रकरणे प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. या नुकसानीचा आढावा घेऊन बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!